‘वडिलांनाच श्रीकांत शिंदे काबील वाटत नसतील, त्याला आम्ही काय करणार?’; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar On Srikant Shinde – प्रफुल्ल पटेल यांना पंतप्रधान मोदींकडून एक व्यक्तीगत गिफ्ट मिळालेले आहे. ईडीने त्यांची जप्त केलेली मालमत्ता सोडवली, त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही, तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
तसेच आता अजित पवार गटाला विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी लागणार आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. शिवाय वडिलांना श्रीकांत शिंदे काबील वाटत नसतील तर आम्ही काय करणार असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रसार माध्यमांशी बोलतांना रोहित पवार म्हणाले, ”आम्ही सर्व जण आधीपासूनच सांगत होतो. लोकसभेपुरता अजित पवारांचा वापर भाजपकडून केला जाणार आहे. आता जे शरद पवारांना सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढावे लागेल.
राज्यातील नेते समजूत काढण्याचे काम करू शकतात, बाकी त्यांच्या हातात काहीच नाही. कारण त्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावे लागते, असेही ते म्हणाले.
सर्वाधिक फायदा पटेलांना
अजित पवारांवरील आरोप तसेच आहेत. सुनील तटकरे यांच्यावरील आरोपही तसेच आहेत. मात्र केवळ प्रफुल्ल पटेल यांच्यावरील कारवाई थांबण्यात आली.
त्यामुळे शरद पवारांना सोडून महायुतीत जाणाऱ्या नेत्यांपैकी सर्वांत जास्त फायदा हा प्रफुल्ल पटेल यांचाच झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे आता राहणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.





