पुणे | रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वारगेट बसस्थानकाच्या गेटवर भरदिवसा वादातून दोघांनी रिक्षाचालकावर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दिवाळीनिमित्त बसस्थानक परिसरात प्रचंड गर्दी होती. अशातच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरच स्वारगेट पोलीस ठाणे आणि सहायक पोलीस आयुक्त कार्यालय आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अंड्या उर्फ अनुप पासलकर व युवराज (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यात जैनउद्दीन शाहजू भाईजान (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी हुसेन खान्दान (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी दुपारी पावने दोनच्या सुमारास बसस्थानका बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारावर घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जैन हे रिक्षा चालक आहेत. त्यांची व आरोपींची दोन दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. दरम्यान, दुपारी जैन हे बसस्थानकाच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी भांडणाचा मुद्दा पुन्हा काढत शिवीगाळ करीत कोयत्यासारखे हत्यार काढून जैन यांच्या डोक्यात तसेच हातावर सपासप वार केले. नागरिकांनी भितीपोटी तेथून पळ काढला. मारहाणीनंतर दहशतीसाठी आरोपींनी जैन यांच्या रिक्षाची काच फोडत तेथून पसार झाले.
पोलिसांना गुन्हेगार जुमानतात…?
दिवाळीनिमित्त स्वारगेट तसेच ट्रॉव्हल्स पाँईटवर बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. कारण, या काळात चोरटे सक्रिय झालेले असतात.
गर्दीत प्रवाशांचा ऐवज चोरून नेण्याच्या घटना घडतात. स्वारगेट बसस्थानकात मार्शलची ड्युटी आहे. बंदोबस्त व पेट्रोलिंग देखील असते. त्यानंतरही मारहाणीसारखा गंभीर प्रकार घडल्याने गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.





