Avimukteshwaranand Saraswati : ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Avimukteshwaranand Saraswati) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारे तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांच्यावर रविवारी सकाळी धावत्या रेल्वेमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोराने आशुतोष यांच्यावर वस्तऱ्याने वार केले. दुसरीकडे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हा सर्व प्रकार बनावट असल्याचे सांगत तो फेटाळून लावला आहे. शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष ब्रह्मचारी हे रेवा एक्सप्रेसने प्रयागराजकडे प्रवास करत होते. सकाळी रेल्वे सिराथू स्टेशनजवळ आली असताना आशुतोष शौचालयात गेले होते. तिथे दबा धरून बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्रयागराज येथील केल्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रेल्वे पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेवर वाराणसीतून आपली प्रतिक्रिया देताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आशुतोष यांनी केवळ स्वतःला सुरक्षा मिळवण्यासाठी आणि एक नकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी हा बनाव रचल्याचा दावा त्यांनी केला.