13 ऑगस्टपासून उपोषण: कबुतरखाना बंदीवर जैन समाज संतापला, गरज पडल्यास शस्त्र उचलण्याचा मुनींचा इशारा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करत दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले. यानंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, १३ ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर गरज पडल्यास शांतताप्रिय असणारा जैन समाज शस्त्र उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.
सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग, पण धर्मासाठी शस्त्रही उचलू –
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले, “आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत. शस्त्र उचलणे हा आमचा स्वभाव नाही, पण धर्माविरोधात कोणी पाऊल उचलले, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही भारताचे संविधान, कोर्ट आणि सरकारला मानतो, परंतु आमच्या धार्मिक तत्त्वांवर गदा आणली, तर आम्ही कोणालाही जुमानणार नाही.” पुढे ते म्हणाले, “१३ ऑगस्टपासून मी एकटा नव्हे, तर देशभरातील १० लाख जैन बांधव उपोषणाला बसतील. गरज पडल्यास शांतताप्रिय समाज असतानाही आम्ही धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलण्यास तयार आहोत.”
‘जैन धर्मालाच का लक्ष्य?’
जैन मुनींनी हा निर्णय राजकीय हेतूने आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आमच्या ‘पर्युषण पर्वा’नंतर पुढील निर्णय घेऊ. जीवदया हा आमच्या धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुठल्याही जीवाचा वध होऊ नये, असे आमच्या धर्मात सांगितले आहे. मग जैन धर्मालाच का लक्ष्य केले जाते? दारू आणि मांसाहारामुळे किती जीवहत्या होते, हेही दाखवावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
पालिकेची कठोर कारवाई: ६८ हजारांचा दंड वसूल
मुंबई उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. १३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पालिकेने १४२ प्रकरणे नोंदवली असून, एकूण ६८,७०० रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक दंड दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावरून वसूल झाला आहे. या ठिकाणी ५१ व्यक्तींकडून २२,२०० रुपये दंड गोळा करण्यात आला आहे.
जैन समाजाच्या या आंदोलनामुळे मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. १३ ऑगस्टपासून सुरू होणारे उपोषण आणि जैन मुनींच्या आक्रमक इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. येत्या काळात या प्रकरणाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





