Newasa News : कुकाण्यातील रेल्वे समितीचे उपोषण स्थगित! खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी केली मध्यस्थी
नेवासा तालुक्यातील (Newasa News) कुकाणा येथे बेलापूर (श्रीरामपूर)-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाला केंद्राकडून तात्काळ मंजुरी मिळावी या मागणीसाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने दि. ९ फेब्रुवारी २०२६ पासून ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू झाले होते

Newasa News : नेवासा तालुक्यातील (Newasa News) कुकाणा येथे बेलापूर (श्रीरामपूर)-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाला केंद्राकडून तात्काळ मंजुरी मिळावी या मागणीसाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने दि. ९ फेब्रुवारी २०२६ पासून ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू झाले होते. या उपोषणात रितेश विजयकुमार भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार आणि सुरेश वसंतराव नरवणे हे प्रमुख उपोषणकर्ते सहभागी होते.
उपोषणाच्या प्रारंभीच विविध राजकीय नेत्यांनी उपोषणकर्त्यांना भेटी दिल्या आणि आश्वासने दिली. दि. १० फेब्रुवारी रोजी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. उपोषणाच्या ७व्या दिवशी (दि. १५ फेब्रुवारी) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. तसेच दि. ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात हा प्रश्न ठामपणे मांडणार असल्याची ग्वाही देऊन उपोषण सोडण्याचे आवाहन केले.
दि. १७ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विषय मांडण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, मंजुरीचे अधिकृत पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम राहिले.
उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने दि. १८ फेब्रुवारी रोजी खबरदारी म्हणून त्यांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही उपोषण सुरूच ठेवले. उपचारानंतर दि. २० फेब्रुवारी रात्री ते पुन्हा कुकाणा येथील उपोषण स्थळी परतले.
उपोषणाच्या १३व्या दिवशी, शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि रेल्वेचे कार्यकारी अभियंता राजनारायण यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण न करता हा मार्ग मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
या ठोस आश्वासनामुळे उपोषणकर्ते समाधानी झाले. त्यांनी खासदार वाकचौरे आणि अभियंता राजनारायण यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन आमरण उपोषण स्थगित केले.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भैय्यासाहेब देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, नेवासा शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, पंकज लंबाटे, अभिजीत लुनिया, एकनाथ कावरे, भाऊसाहेब सावंत, दौलतराव देशमुख, प्रकाश देशमुख, मच्छिंद्र आरले, अण्णासाहेब गव्हाणे, मुकुंद अभंग यांच्यासह कुकाणा पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या उपोषणामुळे बेलापूर-परळी रेल्वे मार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाकडून येणाऱ्या काळात ठोस प्रगती अपेक्षित आहे.





