Jain Muni Nileshchandra Vijay : जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी उपोषण घेतले मागे; सरकारला दिली 15 दिवसांची मुदत

मुंबई : आझाद मैदानात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दादर कबुतरखानासहीत इतर कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत शासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोवर अन्न आणि पाण्याचा त्याग करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. शासनाच्या आश्वासनानंतर जैन मुनींनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, जर पंधरा दिवसांत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तर मी पुन्हा उपोषण सुरू करीन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भेट घेतली. चर्चेनंतर सरकारतर्फे १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले की, मंगलप्रभात लोढा हे जैन समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि राज्याचे मंत्री आहेत. काल रात्री माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले. पण, मी असंतुष्ट होतो. आज राहुल नार्वेकर आले ते बोलले मार्ग काढू. आता समाजाच्या अनेक संघटना सोबत आल्या. पण, ते म्हटले की १५ दिवस वेळ द्या. त्यामुळे आम्ही मुदत दिली आहे. माझी मागणी पूर्ण झालेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या मागण्या
जैन मुनी म्हणाले की, माझ्या तीन मागण्या आहेत. विलेपार्ले अंधेरी मंदिर तोडले, जैन बोर्डिंग तोडले, आम्हाला सनातन बोर्ड हवे आहे. मुस्लिम बोर्ड जसे, तसेच हवे आहे. गौरक्षक हल्ले थांबावे आणि आमचे ५२ कबुतरखाने खुले करण्यात यावे. आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा शांतीप्रिय आंदोलन करू. मी पालिकेच्या आणि न्यायालयाच्या दोन तासांच्या निर्णयावर संतुष्ट नाही. महापालिकेने दिलेल्या पर्यायी जागा आम्हाला अमान्य आहेत. त्या जागा चार ते पाच किमी अंतरावर आहेत. आम्हाला नवे कबूतरखाने नको. आम्हाला आमचे जुनेच कबुतरखाने हवे आहेत.
जैन समुदायासोबत जे जोडले गेले आहेत त्यांच्या हा आस्थेचा विषय आहे. आमच्या जैन समाजावर आजपर्यंत कोणताही अन्याय झाला नाही. आमच्या समाजात योगी आणि मोदी बसले आहे. योगी धर्म वाचवत आहेत. मोदी देश वाचवत आहेत. त्यामुळे अन्याय होणार नाही. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा आंदोलन करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयेसाठी लढू असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला.





