पुणे जिल्हा | लाडकी बहीणीमुळे शेतीची कामे रखडली

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर) – नुकतेच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिला कागदपत्रे गोळा करणे फॉर्म भरणे यात व्यस्त असल्यामुळे परिसरातील शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून केली जात आहे.
लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये जमा होणार या आशेने सर्व महिलांनी तहसील, सेतू कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक उद्योग शेती या सर्वच ठिकाणी महिलांच्या कमतरतेमुळे उद्योगावर तसेच शेतीच्या कामावर परिणाम होताना दिसत आहे.
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शासनाने प्रथमतः थोडीशी कीचकट स्वरूपाची परंतु नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कागदपत्रांची अट शिथिल केली आहे .परंतु महिलांची कागदपत्रे गोळा करताना कागदपत्रांचा गुंता लक्षात येत नसल्याने गोंधळ उडत आहे. काही ठिकाणी अनावश्यक कागदपत्रे काढण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पहिल्या दिवसापासून चर्चेत आली आहे. सर्व्हर डाऊन, पोर्टल बंद आदी अडचणीमुळे लाडक्या बहिणींचा चांगलाच हिरमोड झाला असून तासन्तास रांगेत थांबूनही दिवसभर कामे होत नाही तर दुस-या दिवशी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत असल्याने अनेकांचे दोनदोन तीनतीन दिवस रोजगार बुडत असल्याच्या तक्रारीही अनेक महिलांनी केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांना वेळ लागतो. शिवाय फॉर्म भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते यामुळे रोजगार बुडत आहे.- दिपाली भोसले, सदस्य, महाळुंगे इंगळे ग्रामपंचायत
पंढरीची वारी सुरू असल्याकारणाने अनेक महिला या वारीसाठी रवाना झाले आहेत त्यातच लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी व्यस्त असल्याने शेतीची कामे रखडली आहेत.- चंद्रकांत इंगवले, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड





