Pune District : महाळुंगे इंगळेत ग्रामराजकारण तापू लागले

महाळुंगे इंगळे : खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीसाठी या वेळी होणार्या निवडणुकीत सरपंचपद लोकनियुक्त असून ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे गावातील विविध गटांकडून सरपंचपदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली असून ग्रामराजकारण तापू लागले आहे.
श्रीक्षेत्र महाळुंगे तालुका खेड हे खेड तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते याशिवाय या गावाच्या चारही बाजूला मोठी औद्योगिक वसाहत यामुळे खेड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून महाळुंगे इंगळे ओळखले जाते.
गावात यापूर्वी सरपंच निवड बहुतेकवेळा अंतर्गत निवड प्रक्रियेमार्फत होत असे; मात्र डिसेंबर 2025मध्ये ग्रामपंचायतीसाठी प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सर्वसाधारण आरक्षणामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार हे मात्र निश्चित गावातील विकासकामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आदी मुद्दे यंदाच्या निवडणुकीत प्रमुख ठरणार आहेत. नव्या नेतृत्वाकडून ग्रामस्थांना ठोस आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता गावात सध्या तरी दोन प्रमुख गट असून दोघांमध्ये सत्तेची चुरस कायम असते. यंदा या दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तरुण नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी देखील युवा वर्गातून उठू लागली आहे. तसेच जसजशी निवडणूक जवळ येईल त्यावेळी गट आणखी वाढणार का हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
ही नावे सध्या चर्चेत
गावातील राजकीय मंडळी आपापली राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी वाड्या वस्त्यांवर भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत. दरम्यान, निवडणुकीला आणखी सहा महिने शिलक असूनही प्रथम लोकनियुक्त सरपंच पदासाठी नितीन तानाजी फलके, विद्यमान सदस्य मनोज चंद्रकांत इंगवले, राजेंद्र शामराव इंगळे, संतोष दत्तात्रय भोसले, लीलाधर तुपे, सुधीर भांगरे ही नावे आघाडीवर असून यात आणखी नावे भर पडणार आहेत, हे मात्र निश्चित!
ग्रामस्थांची अपेक्षा
ग्रामपंचायतीतील इतर सदस्यपदांबाबतही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रचाराची रणनीती, सोशल मीडियाचा वापर, प्रत्यक्ष जनसंपर्क यावर भर दिला जात आहे. गावातील महिलाही यंदाच्या निवडणुकीत सक्रीय सहभागी होण्याचे संकेत देत आहेत. एकूणच, महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. गावाच्या भविष्यासाठी सक्षम, दूरदृष्टी असलेले नेतृत्व मिळावे, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.





