Pune District : कोणतेही पीक घ्या शेतकरी तोट्यातच – सदाभाऊ खोत; राजुरीत दूध उत्पादक गवळी व शेतकर्यांशी संवाद

राजुरी : सातबारावर नाव असलं म्हणजे शेतकरी आहे, हे म्हणणं चुकीचं आहे. ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे आणि जो दिवस-रात्र शेतात कष्ट करतो, तोच खरा शेतकरी आहे. पण आज खरे शेतकरी फक्त 20 टक्केच शिल्लक राहिले आहेत. कोणतेही पीक घेतलं तरी शेतकर्याला शेवटी गोंडा कर्जाचाच येतो, असे मत माजी मंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
खोत यांनी मंगळवारी राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यवसायिक संस्थेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी दूध उत्पादक गवळी व शेतकर्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खोत म्हणाले की, मी स्वतः सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय केला आहे. या व्यवसायात शेतकर्यांना खूप परिश्रम करावे लागतात, मात्र त्या श्रमांचा योग्य मोबदला त्यांच्या पदरात पडत नाही. पशुखाद्य आणि चार्याचे वाढते दर पाहता दूध उत्पादन शेतकर्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. सध्या शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
दूध व्यवसायात नफा नाही, तर कांद्याचे भाव गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीही खर्च वसूल करू शकत नाहीत, ही खंत त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी आमदार अतुल बेनके, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ कवडे, सरपंच प्रिया हाडवळे, गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, दिलीप घंगाळे, वल्लभ शेळके, कारभारी औटी, अविनाश औटी, भरत घंगाळे, लक्ष्मण फावडे, बाळासाहेब हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, गोविंदराव औटी, तसेच संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व शेकडो दूध उत्पादक गवळी उपस्थित होते.यावेळी गणेश सहकारी दूध व्यवसाय संस्थेच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माजी आमदार अतुल बेनके आणि युवा नेते वल्लभ शेळके यांची भाषणे झाली.
दिलासा देणारी धोरणे राबवावित
यावेळी उपस्थित शेतकरी व दुग्ध उत्पादक गवळी यांनी कांदा, द्राक्ष तसेच दुधाच्या बाजारभावासंदर्भातील प्रश्न सदाभाऊ खोत यांच्यासमोर मांडले. शेतकर्यांना दिलासा देणारी धोरणे राबवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.





