Pune District : गव्हाच्या सोन्याने उजळला शेतकरी; ३० रुपये प्रति किलो दरामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण
Pune District : अनेक शेतकऱ्यांनी आपला माल थेट विक्री करण्याऐवजी साठवणुकीवरही भर दिला आहे. कष्टाचे चीज होत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला असून आगामी हंगामासाठी सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे.

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि परिसरात यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोन्याचा ठरला आहे. शेतशिवारात सध्या गव्हाच्या कापणी आणि मळणीची मोठी लगबग सुरू असून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कापणी यंत्रांचा आवाज घुमत आहे. धान्याने भरलेली पोती पाहून गावागावांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा थंडीचा कालावधी समाधानकारक राहिल्याने आणि अवकाळी पावसाचा फटका न बसल्याने गव्हाचे पीक जोमाने आले असून, उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.
परिसरात प्रति एकर सरासरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळत असून, सध्या बाजारात सुमारे ३० रुपये प्रति किलो इतका समाधानकारक दर मिळत आहे. यामुळे कष्टाला योग्य मोबदला मिळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. गहू हे केवळ रब्बीतील मुख्य पीक नसून ते जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठीही महत्त्वाचे मानले जाते. या पिकाचा भुसा पुढील खरीप हंगामातील टोमॅटो व भाजीपाला पिकांसाठी आच्छादन म्हणून उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी दुहेरी फायदा घेत आहेत.
शिवारात गव्हाच्या राशी आणि मळणीची धामधूम सुरू आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरला असून, निसर्गाच्या साथीमुळे उत्पादनाची गुणवत्ताही दर्जेदार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला माल थेट विक्री करण्याऐवजी साठवणुकीवरही भर दिला आहे. कष्टाचे चीज होत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला असून आगामी हंगामासाठी सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गहू उत्पादनाचे गणित…
गहू पिकासाठी सध्याच्या काळात जमिनीची मशागत, बियाणे, खते, सिंचन आणि कापणी-मळणी असा प्रति एकर साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मजुरी आणि डिझेलचे दर वाढल्याने खर्च वाढलेला असला, तरी चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना प्रति एकर ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती समाधानकारक नफा राहत असल्याने रब्बी हंगामाचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे.
जुन्नर परिसरात गव्हाच्या वाणांचा प्रवास…
पूर्वी या भागात खपली गहू आणि काळ्या कुसळाच्या गव्हासारख्या पारंपरिक वाणांना मोठी मागणी होती. त्यानंतर लोकवन आणि सत्तर-सत्तर या वाणांनी बाजारपेठ व्यापली होती. मात्र, आता बदलत्या शेती पद्धतीनुसार शेतकरी अंकुर केदार, गोल्ड-२३ आणि श्रीराम सुपर यांसारखी सुधारित वाणे स्वीकारत आहेत. कमी कालावधीत येणारी, उंचीने कमी आणि अधिक उत्पादन देणारी ही वाणे सध्याच्या हवामानाला पूरक ठरत असल्याने त्याकडे कल वाढला आहे.





