Farmers Protest: विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा (SKM) च्या बॅनरखाली बुधवारी (5 मार्च) चंदीगड येथे धरणे आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. केंद्रशासित प्रदेशातील सर्व प्रवेश मार्गावर पंजाबमध्ये विविध ठिकाणी अनेक बॅरिकेड्स लावून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांनी बुधवार, 5 मार्चपासून चंदीगडमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. ते ट्रॅक्टर मोर्चा काढत आहेत. प्रत्युत्तर म्हणून, चंदिगड पोलिसांनी 18 प्रवेश मार्ग सील केले आहेत. तसेच चंदीगड सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सात झोनमधील सर्व डीएसपी आणि एसएचओसह सुमारे 2,000 पोलिस एंट्री पॉइंटवर तैनात करण्यात आले आहेत. SKM हा 30 हून अधिक शेतकरी संघटनांचा समूह आहे. आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ 5 मार्चपासून चंदीगडमध्ये आठवडाभराच्या धरणे आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. पंजाब पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) एच.एस. भुल्लर म्हणाले की, आंदोलक शेतकऱ्यांना कोणत्याही किंमतीत चंदीगडपर्यंत पोहोचू दिले जाणार नाही. बुधवारी सकाळी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांतून चंदीगडला निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब पोलिसांनी ठिकठिकाणी अडवले आहे. शेतकऱ्यांना ताब्यात घेतले – मोगा येथील क्रांतीकारी किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष जतिंदर सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, चंदीगडला जात असताना त्यांना पंजाब पोलिसांनी मोगा जिल्ह्यातील अजितवाल येथे अडवले. सिंह यांनी दावा केला की त्यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चंदीगडला जाऊ न दिल्याने शेतकऱ्यांनी भगवंत मान सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यांनी सांगितले की, समराळा येथेही पोलिसांनी शेतकऱ्यांना चंदीगडला जाण्यापासून रोखले. पटियाला येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्ते शेतकरी चंदीगडच्या दिशेने जाऊ नयेत याची पोलीस काळजी घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये. शेतकऱ्यांना चंदीगडच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी मोगाच्या चुहार चक परिसरात बॅरिकेड्स लावले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 100 पोलीसांना चौकीवर तैनात करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना चंदीगडला जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. पोलिसांची नाकाबंदी, प्रचंड वाहतूक कोंडी – संगरूरमध्ये पोलिसांनी घराचों आणि भवानीगडसह अनेक ठिकाणी चौक्या उभारल्या. खरर येथील भागो माजरा टोलनाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणाच्या संयुक्त राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चंदीगड-मोहाली सीमेवर बॅरिकेड्स लावले आहेत. सखोल तपासणीमुळे मोहाली ते चंदीगडची वाहतूक सीमा चौक्यांवर विस्कळीत झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली. चंदीगडच्या पोलीस अधीक्षक गीतांजली खंडेलवाल यांनी सांगितले की, सर्व सीमा चौक्यांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चंदीगड पोलिसांनी मंगळवारी ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी करताना सांगितले होते की सुरळीत वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 5 मार्च रोजी काही रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित केली जाऊ शकते. मागणी काय आहे? SKM ने आता रद्द केलेल्या तीन शेती कायद्यांविरोधात 2020 च्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. कृषी विपणनावरील राष्ट्रीय धोरण आराखड्याचा केंद्राचा मसुदा मागे घ्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी, राज्य कृषी धोरणाची अंमलबजावणी आणि राज्य सरकारने एमएसपीवर सहा पिकांची खरेदी करावी, अशी त्यांची मागणी आहे.