पुणे जिल्हा | जेसीबी,ट्रॅक्टरचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत

वेल्हे, (प्रतिनिधी) – सध्या तालुक्यामध्ये मान्सूनच्या आगमनानंतर शेतीपूरक कामांना जोमाने सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी शेतीच्या मशागतीच्या कामांना गती आली आहे. भात पेरणी उरकत आली असून शेतीची अन्य कामे करण्यात शेतकरी वर्ग गुंतला आहे.
परंतु सद्यस्थितीत प्रत्येक ठिकाणी पारंपारिक नांगरणी, ओढणी, चिखलणी व अन्य मशागत कामांसाठी लोकांना ट्रॅक्टर, जेसीबी अशा आधुनिक साधनांवर आवलंबून राहावे लागत आहे.
मात्र, जेसीबी व ट्रॅक्टरचा तासाचा दर वाढल्यामुळे ही साधने उपलब्ध होत नसल्यामुळे व जी उपलब्ध होतात ते मालक आवाच्या सव्वा पैशाची मागणी शेतकऱ्यांकडे करीत असल्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
बांधकामे किंवा इतर कामांसाठी भरपूर पैसे मिळत असल्याने तेवढ्याच पैशांची मागणी जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालक हे शेतकऱ्यांकडे करीत आहे. मोठी रक्कम देणे हे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
सध्या जेसीबीचा एक तासाचा दर हजार ते बाराशे रुपये असून ट्रॅक्टरसाठी सहाशे ते सातशे रुपयापर्यंत पैशाची मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे. प्रत्यक्ष इंधनाचे दर वाढले तरी इतका दर अन्य ठिकाणी नाही. जो राजगड तालुक्यात आहे. हे सर्व माहीत असूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे.
राजगड परिसरातील आंबवणे सर्कलमधील सर्व गाव कामगार तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बेकायदा बांधकामात जेसीबी, ट्रॅक्टर अथवा अन्य जी काही साधने असतील त्यासह त्यांच्या मालकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करून या मशीनरी जप्त कराव्यात. शिवाय कुठेही या लोकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. – रतन कांबळे, मंडलाधिकारी आंबवणे सर्कल (ता.राजगड)





