सातारा,- अवैध आणि विनापरवाना उत्खनन प्रकरणी सातारा तहसीलदारांनी ताब्यात घेतलेल्या एका जेसीबीच्या प्रकरणी झालेली दंडात्मक रक्कम भरण्यात टाळाटाळ झाली असल्याने प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या आदेशानुसार संबंधित जेसीबीचा तहसीलदार कार्यालयात बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी जाहीर लिलाव होणार असल्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले. सातारा तालुक्यात काही महिन्यांपूर्वी अवैध आणि विनापरवाना उत्खनन, वाहतूक होणाऱ्या गौण खनिज प्रकरणामध्ये जेसीबी (एमएच ११ बीए १७८६) ताब्यात घेण्यात आला होता. त्या प्रकरणात ३ लाख ६० हजारांची दंडात्मक कारवाई झाली होती. मात्र, संबंधिताने ही रक्कम न भरल्याने प्रलंबित वसुलीसाठी अखेर त्या जेसीबीचा लिलाव करून रक्कम वसुलीचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार संबंधित थकबाकी वसुलीसाठी ताब्यात घेतलेल्या वाहनाचा जाहीर लिलाव करून रक्कम वसुलीची धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले.