अहमदनगर | शिवपाणंद रस्ते व शेतरस्त्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक

शेवगाव – शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्यप्रमुख शरदराव पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले, रवींद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका कृती समितीच्यावतीने शेवगाव तालुक्यातील शिवपाणंद रस्ते व शेतरस्ते खुले करा, या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी रॅली काढली. शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान, भारत माता की जयच्या घोषणा देत शेवगाव तहसील कार्यालयावर रॅली धडकली.
तीन तास ठिय्या आंदोलनानंतर तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शिवपाणंद रस्ते व शेतरस्ते समितीचे प्रमुख शरद पवळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील रस्ते पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधून लगेच आदेश जारी केले. त्यानुसार भूमी अभिलेख व संरक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील चार महिन्यांत तालुक्यातील रस्त्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी काढले जातील. २ ऑक्टोबर महात्मा गांधी गांधी जयंतीच्या पूर्वीच तालुक्यातील गाव पातळीवरील रस्ते ग्राम समित्या स्थापन केल्या जातील, असेही निर्देश जारी करण्यात आले.
यावेळी रस्ते पीडित शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रवींद्र सानप, शहाराम आगळे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब बोडखे, श्यामराव सावंत, शिवाजी रिंधे, भाऊसाहेब सामृत, काकासाहेब हारदास,राजेंद्र फाटके, परमेश्वर मिर्झे, श्रीकांत निकम , निसार शेख, शंकर शिदे, आनंद गांधी, सतीश कणगरे, भाऊसाहेब आर्ले, कचरू इसरवाडे व शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.





