Farmer Success Story: बाप रे! अवघ्या ६० झाडांमधून वर्षाला ७ ते ८ लाखांची कमाई; वाचा या शेतकऱ्याची कमाल
Farmer Success Story: कमी खर्च, उत्तम नियोजन आणि थेट मुंबई मार्केटमध्ये विक्री; इंदापूरच्या शेतकऱ्याने १ एकर जांभळाच्या बागेतून मिळवले ७ ते ८ लाखांचे खात्रीशीर उत्पन्न.

Farmer Success Story – शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शेतीकडे वळत, योग्य नियोजन आणि आधुनिक वाणाची निवड केल्यास शेतीतूनही लाखोंचे खात्रीशीर उत्पन्न मिळू शकते, हे इंदापूर तालुक्यातील पळसदेव (शिंदेवस्ती) येथील उत्तम राघु बनसुडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘कोकण बहाडोली’ या जांभळाच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणाची लागवड करून त्यांनी ‘काळ्या सोन्या’च्या माध्यमातून आपल्या घरात समृद्धीची लक्ष्मी आणली आहे. उत्तम बनसुडे यांनी पाटबंधारे विभागात दफ्तर कारकून म्हणून सुमारे ३८ वर्षे सेवा केली.
या दरम्यान त्यांनी भिगवण, लोणी देवकर, पळसदेव, यवत अशा विविध ठिकाणी शासकीय सेवा बजावली. निवृत्तीनंतर त्यांनी पत्नी संगीता व मुलगा सुहास यांच्या मदतीने शेती व्यवसायाला सुरुवात केली. शेती हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जात असला, तरी त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत फळबाग लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात दीड एकर पेरू आणि एक एकर क्षेत्रावर ‘कोकण बहाडोली’ जातीच्या जांभळाची ६ वर्षांपूर्वी लागवड केली होती. इतर फळपिकांच्या तुलनेत जांभळाला कमी खर्च येत असला, तरी खते, औषधे आणि मजुरी मिळून वर्षाला सुमारे २ ते ३ लाख रुपयांचा खर्च होतो.
मुंबई मार्केटमध्ये जांभळाला मोठी मागणी
गेल्या दोन वर्षांपासून जांभळाचे उत्पादन सुरू झाले आहे. जांभळाचा हंगाम सुरू झाला की, पुढील ३० ते ४० दिवस दररोज उत्पादन मिळते. याविषयी माहिती देताना उत्तम बनसुडे म्हणाले की, “सध्या बागेतून दररोज साधारणतः ३०० ते ४०० किलो जांभळाचे उत्पादन होत असून, हा सर्व माल विक्रीसाठी मुंबई मार्केटला पाठवला जात आहे. तिथे ग्रेडनुसार ‘ए’ ग्रेडला १०० ते १५० रुपये,
‘बी’ ग्रेडला ६० ते ८० रुपये आणि ‘सी’ ग्रेडच्या मालाला ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. या वर्षी केवळ १ एकर जांभळातून ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.” पॅकिंगसाठी सध्या बॉक्स उपलब्ध होत नसल्याने ते थेट क्रेटमध्ये १० किलोचे वजन करून माल पाठवत आहेत. बॉक्स पॅकिंग केल्यास आणखी चांगला दर मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
बनसुडे यांचा सल्ला अन् तांत्रिक गणित:
1.योग्य वाण (व्हरायटी): महाराष्ट्रातील कोकण भागात प्रसिद्ध असलेली ‘कोकण बहाडोली’ ही जांभळाची स्थानिक वाण सर्वोत्तम आहे. याची फळे आकाराने मोठी, लांबट, गडद जांभळ्या रंगाची, रसाळ आणि चवीला गोड असतात. यात गर जास्त आणि बी लहान असल्याने बाजारात मोठी मागणी असते.
2.हवामान व जमीन: या वाणासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू (pH) ६.५ ते ७.५ असावा.
3.लागवड अंतर: जांभळाची दाट लागवड केल्यास फळधारणा नीट होत नाही. त्यामुळे ८ मीटर × ८ मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. या अंतराने १ एकरात साधारण ६० ते ६५ झाडे बसतात.
4.खत व पाणी व्यवस्थापन: १ मीटरच्या खड्ड्यात २५ किलो शेणखत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट देऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला (जून-जुलै) कलमाची रोपे लावावीत. पहिल्या २ ते ३ वर्षांत ठिबक सिंचनाने नियमित पाणी द्यावे.
5.उत्पादन कालावधी: लागवडीनंतर साधारण ४ वर्षांनी उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. या पिकाला प्रक्रिया उद्योगातही (जॅम, सिरप, व्हिनेगर) मोठी मागणी आहे.





