Bhor News : बळीराजावर अस्मानी संकट! भोरमध्ये अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव; पिकांचे मोठे नुकसान
Bhor News : ढगाळ वातावरणानंतर बुधवारी अवकाळी पावसाची हजेरी; ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत.

Bhor News – तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर, बुधवारी (दि. १८) दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला असला, तरी काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात असून शेतकऱ्यांची कापणीसाठी लगबग सुरू होती. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून ती भरडणीसाठी छतावर किंवा अंगणात ठेवली होती, त्यांची या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कापणी केलेले पीक भिजून खराब झाले आहे.
तालुक्यातील पुणे-सातारा महामार्ग या भागात पावसाचा जोर सर्वाधिक होता. भोर शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर दक्षिण पट्ट्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. तालुक्याच्या पश्चिम व पूर्व पट्ट्यात पावसाने हुलकावणी दिली, मात्र ढगाळ वातावरण कायम होते. अवकाळी पावसासोबतच काही भागात गारा पडल्याने आंब्याचा मोहर आणि फळांना मोठा फटका बसला आहे.
आंबा पीक आता पूर्णतः धोक्यात आले असून बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते, जे पीक अजून शेतात उभे आहे त्यावर फारसा परिणाम होणार नाही; मात्र ज्यांची कापणी होऊन पीक शेतात वाळत होते, ते भिजल्यामुळे काळे पडण्याची आणि खराब होण्याची भीती आहे.




