Nashik News : नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू

नाशिक – नाशिकमधील भडाणे-रायपूर शिवरस्त्यावर मजुरी करून घरी परतणाऱ्या रामदास सिताराम आहेर (वय ४५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शेतकरी रामदास आहेर मजुरी करून घरी परतत असताना गट नंबर ८३ मध्ये अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रामदास यांच्यावर झडप घेत त्यांच्या गळ्याला धरत रस्त्याच्या बाजूला झुडपात घेऊन गेला.
यावेळी सचिन भाऊसाहेब आहेर हे याच रस्त्याने गाडीवरून जात असताना त्यांना रस्त्यावर रक्ताचे डाग दिसले. झाडांमध्ये आवाज आल्यामुळे त्यांनी गाडीचा प्रकाश त्या दिशेने टाकला असता त्यांना बिबट्या दिसून आला.
त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला. यावेळी घटनास्थळी पहाणी केली असता रामदास आहेर यांचा गळाच बिबट्याने फाडल्याने रामदास मृत अवस्थेत आढळून आले.





