Farah Khan । कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने अलीकडेच खुलासा केला आहे. एका निर्मात्याने तिला ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात त्याच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र फराहने तो प्रस्ताव साफ फेटाळून लावला. निर्मात्याच्या मुलाऐवजी फराहने नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांचा मुलगा विवान शाहला ‘हॅपी न्यू इयर’साठी साइन केले. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. फराह खानने लेखक आणि कॉमेडियन झाकीर खान यांच्याशी बोलतांना अनेक किस्से शेअर केले. तिने झाकीरला घरी जेवणासाठी बोलावले होते यावेळी तिने ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटातील कास्टिंगचा किस्सा सांगितला. हा चित्रपट 2014 साली रिलीज झाला होता आणि तो फराह खानने दिग्दर्शित केला होता. फराह म्हणाली, ‘तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ‘हॅपी न्यू इयर’च्या वेळी एका निर्मात्याने मला त्याच्या मुलाला कास्ट करण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मी ‘झाशीची राणी’ बनले आणि मी असे कधीच करणार नाही असे सांगितले. मी चित्रपटावर अन्याय करणार नाही. असं माझं स्पष्ट मत होत जर शाहरुखला कळले की मी निर्मात्याच्या मुलाला चित्रपटात कास्ट करण्यासाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत? तर काय झाले असते याची मला कल्पना होती. मी असे करणार नाही. असं मी ठरवलं होत. मी विवान शाहला चित्रपटात कास्ट केले कारण मला वाटले होते की मी अशा व्यक्तीला कास्ट करेन जो व्यक्तिरेखा आणि चित्रपटाला पूर्णपणे न्याय देईल.’ ‘हॅपी न्यू इयर’ची निर्मिती शाहरुख खान आणि गौरी खान यांनी केली होती. फराह आणि शाहरुखचा हा तिसरा चित्रपट होता. यात बोमन इराणी, सोनू सूद आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका होत्या. रिपोर्ट्सनुसार, याने 408 कोटींची कमाई केली होती, पण स्टोरी फारशी आवडली नाही.