प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी बांधली तिसऱ्यांदा लग्नगाठ

नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. २०२० मध्ये साळवे यांनी दुसरे लग्न केले होते. हरीश साळवे हे केंद्र सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘वन नेशन-वन इलेक्शन’ समितीचे सदस्य देखील आहेत.
देशातील सर्वात महागडे वकील म्हणून यांची ओळख असलेल्या हरीश साळवे यांनी नुकतेच ट्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्नगाठ बांधली. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (२०२०) यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. साळवे आणि मीनाक्षी यांचा ३८ वर्षांच्या लग्नानंतर जून २०२० मध्ये घटस्फोट झाला. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.
हरीश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ६८ वर्षीय वकील साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासह अनेक हाय-प्रोफाइल केसेस हाताळल्या आहेत.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी जाधव यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी साळवे यांनी फी म्हणून अवघा १ रुपया आकारला आणि यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली होती.




