जम्मू – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी कॉंग्रेस मधून आपल्या राजकारणाची सुरूवात केली पण आता त्या शिवसेनेशी संबंधीत आहेत. त्या आज कडाक्याच्या थंडीत सकाळी आठच्या सुमाराला या यात्रेत सहभागी झाल्या. राहुल यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर यावेळी चर्चा केली.
प्रख्यात लेखक पेरुमल मुरुगन, जम्मू आणि काश्मीर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकार रसूल वाणी, जी ए मीर आणि माजी मंत्री अब्दुल हमीद कारा हे देखील हातात तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा आता अखेरच्या टप्प्यात असून 30 जानेवारी रोजी यात्रेचा समारोप होणार आहे. जम्मू काश्मीरातील राहुल गांधी यांच्या यात्रेत अनेक शिष्टमंडळेही त्यांना भेटत आहेत.
कालच काश्मीरी पंडितांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. त्याच्या आधी लडाखचे 65 जणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले होते. काश्मिरी पंडित स्थलांतरित महिलांचा एक गट, त्यांचा पारंपारिक पोशाख परिधान करून आणि फुलांच्या पाकळ्या घेऊन, गांधींच्या स्वागतासाठी प्रसिद्ध कोल-कंदोली मंदिराबाहेर थांबला होता.