Hamal De Dhamal Movie : निळू भाऊ-लक्ष्या मामांसोबत ‘ढाकुमाकुम’ करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? VIDEO पाहून थक्क व्हाल.!
त्यांच्यासोबत निळू फुले, सुधीर जोशी, रमेश भाटकर, विजय पाटकर यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

Hamal De Dhamal Movie – दहीहंडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात उंचच उंच मानवी मनोरे, गोविंदांचा जल्लोष आणि कानावर पडतो तोच आवाज… ‘गोविंदा रे गोपाळा… ढाकुमाकुम ढाकुमाकुम!’ गेल्या अनेक दशकांपासून हे गाणं दहीहंडी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाचा अविभाज्य भाग बनलं आहे. गाण्याची धून लागली की आजही अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो.
विशेष म्हणजे, या गाण्यात विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळतो. मात्र, या गाण्यातील एक चेहरा अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या नजरेतून अक्षरशः निसटला होता. तो चेहरा म्हणजे आज घराघरात लोकप्रिय झाला आहे.
‘गोविंदा रे गोपाळा’ हे गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आणि त्यात अभिनेते ‘आदेश बांदेकर’ यांचा जुना अंदाज चाहत्यांच्या नजरेत आला. एका व्हायरल रिलमध्ये त्यांच्या या जुन्या गाण्यातील झलक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात आदेश बांदेकर निळू फुले यांच्यासोबत दिसतात आणि गाण्याच्या एका भागात ते ओळही म्हणताना दिसतात.
आजच्या काळातील आदेश बांदेकर आणि त्या काळातील तरुण आदेश बांदेकर यांच्यातील लूकमध्ये कमालीचा फरक असल्याने अनेक चाहत्यांना त्यांना पहिल्यांदा ओळखणंही कठीण जात आहे. त्यामुळे हा जुना व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदेश बांदेकर यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. “जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद” अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
एकाच गाण्यात दिग्गजांची मांदियाळी!
‘गोविंदा रे गोपाळा…’ या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भन्नाट उपस्थिती आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले आणि वर्षा उसगांवकर यांच्यासह आदेश बांदेकरही या गाण्यात दिसतात. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भन्नाट नृत्यामुळे आणि गाण्याच्या उत्साही तालामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसलं. आज दहीहंडीच्या उत्सवात डीजेवर हे गाणं वाजलं की तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचतो.
‘हमाल दे धमाल’ची कथा नेमकी काय होती?
‘हमाल दे धमाल’ हा १९८९ साली प्रदर्शित झालेला लोकप्रिय मराठी कॉमेडी चित्रपट. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. चित्रपटाची कथा राजा नावाच्या एका साध्या आणि प्रामाणिक हमालाभोवती फिरते. एका पैजेमुळे त्याचं आयुष्य बदलतं आणि त्याला सुपरस्टार बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगांवकर प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्यासोबत निळू फुले, सुधीर जोशी, रमेश भाटकर, विजय पाटकर यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आदेश बांदेकर यांचीही या चित्रपटात भूमिका होती.
या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचीही यात विशेष उपस्थिती होती. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट आणि विनोदाची भन्नाट मेजवानी यामुळे ‘हमाल दे धमाल’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.






