खेड-शिवापूर टोल नाक्यावरील बनावट पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक

खेड – शिवापुर : पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर ( ता. हवेली ) या टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत एका सजग नागरिकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलिसांनी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन केले असता टोलच्या बनावट पावतीचे रॅकेटचा पर्दाफाश उघड झाला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात सात कर्मचाऱ्यांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडशिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची लूट करून फसवणूक केल्याप्रकरणी सुदेश प्रकाश गंगावणे (२५, रा. वी धोम कॉलनी, ता. वाई ), अक्षय तानाजी सणस (२२, रा. नागेवाडी. ता. वाई, सातारा ), शुभम सीताराम डोलारे (१९ , रा. जनता वसाहत, पुणे ), साई लादुराम सुतार (२५, रा. दत्तनगर, कात्रज ), हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे ( पूर्ण नाव व पत्ता नाही ) व इतर टोल कर्मचाऱ्यांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक आहे. याबाबत अभिजित वसंत बाबर ( रा. पुणे ) यांनी फिर्याद दिली असून महामार्गावरील टोलनाक्यावर असलेल्या रॅकेटवर कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल होत आहे.
अभिजित बाबर हे पुण्यातून स्वतःच्या चारचाकी वाहनातून सातारा या मुळगावी दि. १६ व २० फेब्रुवारी रोजी खेडशिवापूर टोलनाक्यावर १९० आणि आनेवाडी टोलनाक्यावर १३० रुपयांची ये – जा करताना टोल कर्मचाऱ्यांनी पावती दोन्हीवेळी दिली होती. अनेक वाहनचालकांना अशाच प्रकारे पावती देऊन वाहने सोडली जात होती. यावेळी बाबर यांना खेडशिवापूर व आनेवाडी टोलवरील पावतीच्या साईजबाबत संशय आल्याने त्यांनी फसवणुकीबाबत पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत तक्रार केली होती.
सदरबाबत शहानिशा करण्यासाठी दि. २४ बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास खेडशिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दोन पथके गुन्हे शाखेने रवाना करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गंधारे, उपनिरीक्षक एस. के. पठाण, नाईक सी. एस. जाधव, अमोल शेडगे, एम.एस. भगत, ए.आर जावळे यांनी कारवाई पथकात कामगिरी केली आहे. पुढील तपास राजगड ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहे.
असे केले स्टिंग ऑपरेशन : –
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सरकारी वाहन, दोन पंचासह फिर्यादीच्या वाहनात बसून खेडशिवापूर टोलनाक्यावर सातारा बाजूकडे जाताना टोल भरून पावती घेतली. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी १९० टोल रक्कम ऐवजी पावती नसेल घ्यायची असेल तर १०० रुपये द्या अशी मागणीही केली होती. मात्र फिर्यादीने १९० ची पावती टोलवर घेतली. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजगड पोलिसांच्या मदतीने टोलवरील वेगवेगळ्या लेनवरील कर्मचाऱ्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात पावत्या आढळून आल्या. यावेळी जमा झालेल्या अनेक पावत्या बनावट असल्याचे संबधित शिफ्ट मेनेजरने सांगितले. याबाबत टोल व्यवस्थापक अमित भाटीया यांनी टाळाटाळ करत अधिक बोलण्यास नकार दिला.
‘खेडशिवापूर टोलनाका हा भ्रष्टाचाराने माखलेला असून याची चौकशी केली तर प्रंचड घोटाळे बाहेर येतील. यासाठी खेडशिवापूर टोलनाक्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे.” – ज्ञानेश्वर दारवटकर, कृती समिती निमंत्रक





