नागपूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधी वर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे.
याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांचा बचाव केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांनाच निधी दिलेला नाही. भाजपा-सेनेच्या नेत्यांनाही दिला आहे आणि इतरही काही आमदारांना दिला आहे.
सर्वांना हा निधी दिला आहे. त्यामुळे केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांना निधी दिला, असे म्हणणे योग्य होणार नाही, असं स्पष्ट मत यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केलं. नागपूर येथे रविवारी ते माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी भाजप सरकारसोबत जाऊन तिजोरीच्या चाव्या ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अजित पवार यांनी आमदारांना निधीवाटप केल्याने शिंदे गटातील आमदारांकडून नाराजी नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.