सत्तेचा वाद संघ दरबारी; फडणवीसांनी घेतली मोहन भागवतांची भेट

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना ठाम राहिल्याने राज्यात सत्ता स्थापनेबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचा वाद सरसंघचालकांच्या दारात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत नितीन गडकरी यांचे नाव समोर आले आहे.
सोमवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत परतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी “वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे उपस्थित होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि बंद दाराआड चर्चा केली. जवळपास 1 तास ही चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत भैय्याजी जोशीही सोबत होते.





