नवी दिल्ली – पाच राज्यातील निवडणुकी झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकीकडे काँग्रेसनेते कपिल सिब्बल गांधी घरण्याने राजीनामा देण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे काही नेते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभ राहण्याचं आवाहन करत आहे.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी कॉंग्रेसजनांना केले. सध्याच्या काळात गांधी परिवाराला पाठिंबा न देण्याची कृती आपण स्वत:शीच केलेला विश्वासघात ठरेल, अशा कानपिचक्याही त्यांनी स्वपक्षीयांना दिल्या.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतही कॉंग्रेसच्या पीछेहाटीचे सत्र कायम राहिले. त्या निवडणुकांच्या निकालांनंतर कॉंग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली. काही स्वपक्षीयांनी पीछेहाटीसाठी गांधी परिवारालाच जबाबदार धरल्याचे चित्रही पुढे आले. त्यापार्श्वभूमीवर, खर्गे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना गांधी परिवाराच्या पाठिशी उभे राहण्याची गरज अधोरेखित केली.
सोनियांसह गांधी परिवार धैर्याने राजकीय लढा देत आहे. सोनियांनी पक्षासाठी अनेक त्याग केले. पक्षबांधणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले. कुठल्या पदाची लालसा त्यांनी बाळगली नाही. गांधी परिवारातील कुठल्याच सदस्याने अनेक वर्षे कुठले सरकारी पद भुषवले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष बळकट करण्याच्या उद्देशातून सक्रिय होण्याचे आवाहनही खर्गे यांनी कॉंग्रेसजनांना केले.