लक्षवेधी : इथेनॉल अन् कंपनी मालामाल

– सुहास यादव
केंद्रीय मंत्री पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत जी सातत्याने आणि आग्रही भूमिका मांडत आहेत, त्यावरून इथेनॉल मिश्रणासाठी त्याच्या पुरवठ्याचे मोठे काम विशिष्ट कंपनीला मिळाले आहे किंवा मिळण्याची ठाम शक्यता आहे, असे गृहित धरून गुंतवणूकदार शेअरबाजारातील सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मागे धावत असल्याचे दिसते. यामुळे शेअरबाजारातील मागील 13 सत्रांत कंपनीच्या व्यवहारांना अपर सर्किट लागले आहे.
शेअरबाजार हा कंपन्यांचे ऑर्डरबुक, ताळेबंद आणि कंपनीच्या उत्पादनांना किंवा व्यवसायाला असणारे भविष्य, कंपनीच्या प्रकल्पांचा संभाव्य विस्तार यावरच तेजीत चालू असतो. अनेकदा बाजार कोसळला तरी विशिष्ट कंपन्या दमदारपणे वाटचाल करत असतात. त्यामागे कंपन्यांकडील ऑर्डरबुक, भक्कम आर्थिक स्थिती, विस्ताराच्या योजना याचा त्यामागे हात असतो. जागतिक पातळीवरील तणावाची स्थिती, टॅरिफ वॉर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टोकाची धोरणे यामुळे गेल्या वर्षभरात शेअरबाजार सतत वरखाली होत राहिला.
अशा अनिश्चित आणि अस्थिर परिस्थितीतही गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल 551 टक्क्यांहून जास्त परतावा देणारी कंपनी म्हणजे सियान अॅग्रो इंडस्ट्रीज इन्फ्रा. सोमवारच्या (1 सप्टेंबर 2025) सत्रातही या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले होते. शेअरबाजार सुरू असलेल्या मागील सलग 13 सत्रात कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर वाटचाल करत आहे. लोक या शेअरसाठी जीव टाकताना दिसत आहेत.
गंमतीचा भाग असा आहे, की एखाद्या गुंतवणूकदाराने ही कंपनी काय व्यवसाय करते, तिचा ताळेबंद काय सांगतो, कंपनीचे उत्पादन प्रकल्प किंवा सेवा केंद्रे कुठे आहेत हे पाहायचे म्हटले तर कंपनीचे संकेतस्थळ बंद पडलेले दिसते. मग प्रश्न असा आहे, की ज्या कंपनीचे संकेतस्थळही चालू नाही अशा कंपनीच्या मागे गुंतवणूकदार सैरावैरा का धावू लागले आहेत?
सियान अॅग्रो इंडस्ट्रीज इन्फ्रा लिमिटेड या कंपनीची स्थापना सप्टेंबर 1985 मध्ये झाली. त्यावेळी तिचे नाव उमरेड अॅग्रो कॉम्प्लेक्स लिमिटेड असे होते. डिसेंबर 2015 मध्ये कंपनीचे नाव बदलून सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे करण्यात आले. ही कंपनी सोयाबीन आणि अन्य तेलबियांवर प्रक्रिया करून खाद्यतेलांचे मार्केटिंग आणि विक्री करते. त्याचबरोबर उपपदार्थ म्हणून पेंडविक्री (ऑइल केक) देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात करते. 1990 मध्ये कंपनीने सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लँट आणि वनस्पती तेलाच्या उत्पादनाचा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात सुरू केला.
कंपनी अमृतधारा या ब्रँडखाली सोयाबीन तेल आणि यश ब्रँडखाली करडई तेलाचे उत्पादन आणि विक्री करते. त्याखेरीज तेल उत्पादनातील उपपदार्थ म्हणून पेंड विक्री करते. 2017 नंतरच्या काळात पूर्ती अॅग्रोटेक, जयराम इन्फ्राव्हेंचर प्रा. लि., ज्युपिटर मेटर प्रॉडक्टस् प्रा. लि. अशा कंपन्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये विलीन करण्यात आल्या. 2020 मध्ये नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे कंपनीने डिटर्जंट उत्पादनाचा प्रकल्प सुरू केला. खाद्यतेल, पेंड, डिटर्जंट, मसाले अशा क्षेत्रांत काम करणार्या कंपनीच्या शेअरला अचानक एवढी मागणी का आली असावी आणि लोक त्या शेअरच्या मागे एवढे का धावत असावेत, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
मार्च 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची वार्षिक उलाढाल जेमतेम 17 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 5 कोटी रुपये होता. आता एक वर्षात असे काय घडले, की गुंतवणूकदारांना या कंपनीच्या व्यवसायाला उज्ज्वल भविष्य आणि प्रचंड नफा मिळणार असे वाटू लागले आहे? सोमवारी (1 सप्टेंबर) कंपनीच्या शेअरला सलग 13 व्या सत्रात अप्पर सर्किट लागले आहे.
जुलै 2024 मध्ये कंपनीच्या शेअरचा भाव अवघा 40 रुपये होता तर आताच्या म्हणजे 2025च्या ऑगस्ट महिन्यातील कंपनीच्या शेअरचा भाव 385 रुपये होता. महिनाभरातच त्यात तब्बल 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन सोमवारी बाजार बंद होताना तो 773.35 रुपयांवर होता. याचा अर्थ वर्षभरात शेअरचा भाव 19 पटीने वाढला. म्हणजे ज्याने गेल्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले असतील त्याचे मूल्य आज 19 लाख झाले आहे.
जून 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात तब्बल 5.7 पटीने वाढ होऊन तो 99.83 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 मध्ये अॅडव्हांटेज विदर्भ या नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सियान अॅग्रो इंडस्ट्रीजने चेन्नईत मुख्यालय असलेल्या रामचरण ग्रुपबरोबर इथेनॉल उत्पादनासाठीच्या सामंजस्य करारावर सह्या केल्या. सध्या उसापासून आणि तशाच पिकांपासून इथेनॉलचे उत्पादन केले जाते. सियान अॅग्रो आणि रामचरण समूह मात्र कच्चा माल म्हणून कार्बन डायऑक्साइडचा वापर करून इथेनॉलचे उत्पादन करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे दीर्घकाळात प्रदूषण कमी होईल, असे सियान अॅग्रोचे म्हणणे आहे.
अर्थात देशात इथेनॉलच्या इकोसिस्टीमचा विचार केला तर जवळपास 500 डिस्टलरी असून त्यांची वार्षिक 18 अब्ज लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे. एवढ्या सगळ्या पसार्यात सियान अॅग्रो इंडस्ट्रीजवरच गुंतवणूकदारांच्या उड्या का पडत आहेत, असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पेट्रोलमध्ये तब्बल 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची जी भूमिका सातत्याने आणि ठामपणे मांडत असतात, त्यात दिसून येते. गुंतवणूकदारांचा अंदाज आहे, की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करण्यासाठी इथेनॉल पुरवण्याचे मोठे काम सियान अॅग्रो इंडस्ट्रीजला मिळाले आहे किंवा मिळू शकते.
अर्थात, याबाबतची माहिती कुठेच जाहीर झालेली नाही. गुंतवणूकदार अंदाजावर किंवा त्यांना मिळालेल्या अंतर्गत माहिती, टिप्स किंवा राजकीय नेते, केंद्रीय मंत्र्यांची ताकद लक्षात घेऊन या शेअरच्या मागे लागलेले दिसतात. सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांचे चिरंजीव निखिल आणि सारंग यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपला अंदाज बरोबर ठरून धो-धो परतावा मिळू शकतो, असे गुंतवणूकदारांना वाटल्यास नवल नाही.
इथेनॉलचे वाहनांवर होणारे परिणाम
सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. देशाने निर्धारित वेळेच्या आधीच पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे, असे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (आयएसएमए- इस्मा) म्हटले आहे. दुसरीकडे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे गाडीचे अॅव्हरेज पाच ते दहा टक्क्यांनी कमी होते. पुन्हा दीर्घकाळात इथेनॉलमुळे पेट्रोलच्या टाकीपासून ते इंजिनपर्यंत अनेक भागांना गंज लागतो आणि गाडी खिळखिळी होते, वाहनाचे आयुष्य कमी होते, असे सांगण्यात येते.
भारतातील वाहने हे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून चालवण्याच्या क्षमतेची नाहीत, असेही सांगण्यात येते. सोशल मीडियावर इथेनॉल मिश्रणाच्या विरोधात मोहीम चालवली जात असल्याचे दिसून येते. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या सगळ्या तक्रारी फेटाळून लावताना पेट्रोल लॉबी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करतात. त्याचबरोबर या धोरणाचा फायदा शेतकर्यांना होणार असल्याचा दावा करतात. सध्या तरी या धोरणाचा फायदा सियान अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करणार्यांना धो-धो होत असल्याचे दिसून येते.





