हरियानातील नूह दंगल प्रकरणात प्रशासनाकडून व्यापक बुलडोझर कारवाई

नूह (हरियाणा) – हरियाणाच्या हिंसाचारग्रस्त नूहमध्ये प्रशासनाने संशयीत दंगलग्रस्तांच्या विरोधात व्यापक बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. ज्या हॉटेलमधून जमावावर दगडफेक करण्यात आली होती ते हॉटेल बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत प्रशासनाने ते आज बुलडोझरचा वापर करून पाडून टाकले. ही कारवाई प्रचंड पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
जिल्हा नगररचनाकार विनेश कुमार यांनी सांगितले की, सहारा फॅमिली रेस्टॉरंट नावाची ही हॉटेलची इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती. ते म्हणाले की ही तीच इमारत आहे जिथून गुंडांनी धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक केली.
ही इमारत पूर्णपणे अनधिकृत होती आणि तिला सरकार आणि नगर रचना विभागाने नोटिसा बजावल्या होत्या, असा प्रशासनाचा दावा आहे. शनिवारी सकाळी नूह जिल्हा प्रशासनाने नल्हार रोड परिसरातील 45 हून अधिक बेकायदेशीर दुकाने जमीनदोस्त केली.
हिंसाचारांच्या प्रकारानंतर आता प्रशासनाच्या बुलडोझर कारवाईविषयी सनसनाटी निर्माण झाली आहे. विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई केली जात आहे, असा आरोप सरकारवर केला जात आहे.





