पुणे | लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुतद दि. ३१ आॅगस्टला संपणार आहे.
मात्र, अर्ज भरण्यास तसेच आवश्यक कागदपत्रे जमविण्यात अडचणी येत असल्याने या योजनेस महिनाभराची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला तरी या योजनेची नोंदणी तसेच इतर कार्यवाहीसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, योजनेस मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेटवर्क, कागदपत्रांची अडचण…
या योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड तसेच रहिवासी पुरावे आवश्यक आहेत. अनेक महिलांच्या आधारकार्डमध्ये पत्ता, वय, नावाच्या त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी त्यांच्याकडून आधारकार्ड अपडेट केली जात आहेत.
मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यात महिलांना मोठी दमछाक करावी लागत आहे. परिणामी, कागदपत्र उशीरा मिळणार असल्याने महिलांकडून अर्ज भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, अनेक महिला पात्र असूनही त्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
मुदतवाढ देण्याची मागणी…
या योजनेचा लाभ महिलांना थेट होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे, ज्या महिलांना अद्यापही कागदपत्रे जमा करता आलेली नाहीत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी. यासाठी या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी केली आहे.
या मागणीचे पत्र नागपूरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांंना दिले आहे. तसेच, या योजनेसाठी महिभार मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.





