पुणे | लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वत:साठी वापरा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ग्रामीण भागात लाडक्या बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पैशांचा महिलांना स्वत:सह कुटुंबासाठी फायदा होत आहे. गावोगावी फिरताना त्याबाबत समाधानी प्रतिक्रिया दिल्या मिळत आहे.
योजनेतील पैसे महिलांनी स्वतःचे जीवनमान सुधारण्यासाठी वापरावेत, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
तसेच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण संवाद यात्रेदरम्यान खेड-राजगुरूनगर, भोर-राजगड-मुळशी आणि पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांत डाॅ. गोऱ्हे यांनी भेटी दिल्या. “वय वर्षे ६० पेक्षा जास्त असलेल्या महिलांना या अनेक योजनांची माहिती नाही.
त्यामुळे आम्ही त्यांना ज्येष्ठांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती दिली. वाडी-वस्तीवर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील की नाही, याची शंका होती.
पण, खरेच त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्यांचा विश्वास पटला. आता त्यांना त्या पैशाचा उपयोग विविध कामांसाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले,’ असे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.
तरच तिकीटासाठी विचार होणार
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला माणनारा वर्ग आहे. खेड, पुरंदर आणि भोरमध्ये इच्छुकांनी संपर्क साधला आहे. खेडमध्ये सर्वाधिक इच्छुक आहे.
महायुतीमध्ये सर्व पक्षांची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जोमाने काम करणाऱ्याचा तिकीटासाठी विचार केला जाणार आहे. त्यासाठी बैठका आणि मेळावे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.





