रशिया-क्रिमिया जोडणाऱ्या पुलावर स्फोट; रशियाच्या सैन्याला होणारा रसद पुरवठा खंडीत

मॉस्को – रशिया आणि रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमियाला जोडणाऱ्या एकमेव मालवाहतुकीच्या पुलावर आज सकाळी जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे या पुलाचा काही भाग उद्ध्वस्त झाला. या स्फोटात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर त्यांची कन्या जखमी झाली. या स्फोटामुळे या पुलावरील वाहतुक बंद पडली आहे.
या पुलावरून क्रिमियाच्या फौजांना पुरवली जात असलेली लष्करी मदत पुरवणारी रेल्वे वाहतुक मात्र 6 तासांनंतर पुन्हा सुरू झाली. हा स्फोट युक्रेनच्या दोन सागरी ड्रोनद्वारे करण्यात आल्याचा आरोप रशियाच्या “नॅशनल ऍनटी टेरेरिस्ट कमिटी’ने केला आहे.
मात्र युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या स्फोटाची जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे. युक्रेनने याच पुलावर पूर्वी हल्ला केला होता. मात्र तेंव्हाही युक्रेनने हल्ल्याची थेट जबाबदारी स्विकारली नव्हती.
यावेळी देखील युक्रेनने हात झटकले आहेत. या पुलावर झालेले स्फोट नक्की कशामुळे झाले, याची पूर्ण माहिती मागवली जात असल्याचे युक्रेनच्या संरक्षण सेवा विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
यापूर्वी मे महिन्यात ट्रक बॉम्बने हा पूल उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी झालेल्या स्फोटात पूलाचा काही भाग कोसळला होता. आज झालेल्या स्फोटानंतर पूलाचा काही भाग कलला असल्याचे एका वाहिनीवरच्या व्हिडीओमध्ये दिसते आहे.
रशिया आणि क्रिमियातील दुवा…
रशियाने 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतल्यापासून हा पूल दोन्ही भूभागांना जोडणारा महत्वाचा दुवा ठरला आहे. बांधण्यासाठी 3.6 अब्ज डॉलर खर्च झालेला हा 19 किलोमीटर लांबीचा पूल युरोपातील सर्वात लांब पूल आहे.
या पूलावरून युक्रेनच्या दक्षिणेकडील भागातल्या रशियाच्या सैन्याला रसद पोचवली जात असते. युक्रेनने जोरदार प्रतिहल्ला सुरू केल्यानंतर हा हल्ला झाला आहे. रशियाने युक्रेनच्या धान्य वितरणाच्या कराराला स्थगिती दिल्यानंतर लगेचच हा स्फोट झाला, हे विशेष.





