Baramati News : शिवनगर विद्या प्रसारक मंडळात भ्रष्टाचाराचा स्फोट : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट इशारा

माळेगाव : शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव येथील शैक्षणिक संकुलातील कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आणि कठोर शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले. “मी खोलात जातोय आणि एकामागून एक प्रकार बाहेर येत आहेत. ही संस्था चालवली जातेय की लपवली जातेय?” असा सवाल करत त्यांनी संकुलातील अनागोंदीचा पर्दाफाश केला.
पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की संस्थेला सध्या ११ ते १२ कोटी रुपयांचा तोटा आहे. पगार वेळेवर दिले जात नाहीत. नॉन-टीचिंग स्टाफ इतका भरलेला आहे की काहींना कामच नाही. “शिक्षण नाही, जबाबदारी नाही — फक्त वशिल्याने भरती. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संस्थेने घेतलेले ११ कोटी रुपयांचे कर्ज अजूनही फेडले गेलेले नाही. चालू वर्षात साडेतीन ते चार कोटी रुपयांचा तोटा झाल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. “कोण फेडणार हे कर्ज? कोण जबाबदारी घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
या आर्थिक गोंधळावर ऑडिट सुरू असून, एका व्यक्तीवर २५ ते ३० लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली. “तीन-चार वर्षांचा फ्रॉड आहे. अजून काय काय बाहेर येणार, हे तपासानंतरच कळेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शैक्षणिक शिस्त, कर्मचारी कार्यपद्धती, आणि मेस व्यवस्थेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “एमबीए, बी. फार्मसी, डी. फार्मसीसाठी डिमांड आहे, पण शिस्त नाही. लोक सह्या करतात आणि बाहेर फिरतात. कामाच्या वेळेत दुसऱ्या व्यवसायात गुंतलेले आहेत. संध्याकाळी परत येतात. कोणाचं प्रेशर नाही, कोणाचं उत्तरदायित्व नाही,” असा आरोप त्यांनी केला.
मेस व्यवस्थेवर बोलताना त्यांनी सांगितलं की मुली मेसमध्ये जायला नकार देतात. “मेस इतक्या खराब आहेत की विद्यार्थ्यांना तिथे जाणंही नकोसं वाटतं. स्टाफमध्ये आपलेपणाची भावना नाही. ही संस्था चालवली जातेय की विसरली गेलीय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पवार यांनी स्पष्ट इशारा दिला की पुढच्या वेळी संपूर्ण स्टाफची बैठक घेणार आहेत. “मी बारामतीत चांगलं काम करतोय, पण इथे काय सुरू आहे? शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत त्यांना हे माहिती आहे का?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
२७ तारखेला माळेगाव कारखान्याच्या सभेत अजित पवार यांचा पुढचा गौप्यस्फोट काय असेल, याकडे आता सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.





