Delhi Car Blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट! चार वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी; परिसरात खळबळ

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी एका जोरदार स्फोटाने परिसर हादरला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झाला. या स्फोटामुळे कारने तात्काळ पेट घेतला आणि आगीने बाजूला उभ्या असलेल्या तीन ते चार अन्य वाहनांनाही आपल्या कवेत घेतले.
या घटनेमुळे परिसरात घबराट आणि अफरातफरी पसरली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या काही दुकानांचे दरवाजे आणि खिडक्यांचेही नुकसान झाले.
पोलीस आणि अग्निशमन दलाची धावपळ:
स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दिल्ली अग्निशमन दलाच्या (Delhi Fire Department) माहितीनुसार, त्यांना स्फोटाची सूचना मिळताच त्यांच्या पाच गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले.
#WATCH | A call was received regarding an explosion in a car near Gate No. 1 of the Red Fort Metro Station, after which three to four vehicles also caught fire and sustained damage. A total of 7 fire tenders have reached the spot. A team from the Delhi Police Special Cell has… pic.twitter.com/F7jbepnb4F
— ANI (@ANI) November 10, 2025
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी:
स्फोटाच्या अचूक कारणांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाच्या (Bomb Disposal Squad) टीम्स घटनास्थळी कसून तपासणी करत आहेत. लाल किल्ला परिसर दिल्लीतील अत्यंत गजबजलेल्या आणि गंभीर क्षेत्रांपैकी एक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अत्यंत सतर्कता बाळगण्यात येत आहे.
सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या घटनेबाबत दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. स्फोटाचे नेमके कारण (गॅस सिलिंडर, शॉर्ट सर्किट, की अन्य काही?) याबद्दल तपास पूर्ण झाल्यावरच अधिकृत माहिती समोर येईल.





