Uri Army camp : उरी लष्करी कॅम्पमध्ये स्फोट.! दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवानांचा मृत्यू
जखमी जवानांची ओळख विक्रम बाळकृष्ण चव्हाण (रा. ऐरोली, महाराष्ट्र) आणि अर्जुन राजेंद्र जाधव (रा. शहापूर, महाराष्ट्र) अशी पटली आहे.

Uri Army camp – जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी क्षेत्रात, नियंत्रण रेषेजवळील भागात झालेल्या अपघाती स्फोटात दोन लष्करी जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळील उरी भागातील कमलकोट येथे असलेल्या छावणीत काल संध्याकाळी झालेल्या अपघाती स्फोटात हे दोन जवान गंभीर जखमी झाले होते.
जखमी जवानांची ओळख विक्रम बाळकृष्ण चव्हाण (रा. ऐरोली, महाराष्ट्र) आणि अर्जुन राजेंद्र जाधव (रा. शहापूर, महाराष्ट्र) अशी पटली आहे. त्यांना तातडीने विमानाद्वारे श्रीनगरमधील बदामीबाग छावणीतील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर लष्कराने सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. हा स्फोट नेमका कसा झाला, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा केवळ एक अपघात असल्याचे दिसते आहे. (Uri Army camp)
श्रीनगरमधील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर या घटनेबाबत सविस्तर अधिकृत पत्रक जारी केले जाईल.






