गुजरातमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; १७ जणांचा होरपळून मृत्यू

गुजरात : गुजरातमधील बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या वेळी ही दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक कारखान्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे.
बनासकांठा येथे डीसा नावाचे एक शहर आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता येथील फटाक्याच्या कारखान्यातून स्फोटांचे आवाज ऐकू आले. आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा फटाक्याच्या कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. ही माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि एसडीआरएफ टीमला देण्यात आली.
अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. स्फोटामुळे कारखान्याच्या आतील भिंतींना नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टिनचे शेड विखुरलेले आहेत. धुराचे लोट उठताना दिसले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे परिसर हादरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीसा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांच्या मते, या अपघातात कारखान्याच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#WATCH | Gujarat | Explosion occurs in a factory in the industrial area in Deesa, Banaskantha district; Five workers dead, says Collector. pic.twitter.com/PYkmn4UVeW
— ANI (@ANI) April 1, 2025





