अत्यावस्थ करोनाबाधितांवर मॉकड्रीलप्रमाणे प्रयोग; ऑक्सिजन बंद केल्याने २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू ?

नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसे वागावे यासाठीच प्रयोग करण्यासाठी विविध क्षेत्रात मॉक ड्रील करण्यात येते. पण या प्रयोगातुन कोणाचा तरी जीव वाचवण्याची शिकवणी देण्यात येते. परंतु हाच प्रयोग जर कोणाचा जीव घेत असेल तर..उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयाच्या मालकाने मॉक ड्रीलप्रमाणे प्रयोग केला आणि अत्यावस्थ असणाऱ्या रुग्णांचा ऑक्सिजन पाच मिनिटांसाठी बंद केला त्यात २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागाने आग्रा येथील एका नामांकित रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयाच्या मालकाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्याने २६ एप्रिल रोजी आपण रुग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केल्याचा दावा केला आहे.
“कोण यामधून वाचू शकतं पाहण्यासाठी आपण हा प्रयोग केला,” असं हा मालक व्हिडीओ सांगताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेनंतर करोनाबाधित आणि करोनाची बाधा न झालेल्या मात्र ऑक्सिजनवर असणाऱ्या २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
“इथे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता. मोदीनगरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना डिस्चार्ज देतो घरी घेऊन जा त्यांना असं सांगत होतो पण कोणीही त्यासाठी तयार नव्हते. म्हणून मग मी एखाद्या मॉक ड्रीलप्रमाणे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही २६ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ऑक्सिजनचा पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केला. त्यानंतर २२ रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचे शरीर निळं पडू लागला. या प्रयोगामधून या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला नाही तर ते जगू शकणार नाही हे स्पष्ट झाले.
त्यानंतर आम्ही अतिदक्षता विभागातील इतर ७४ रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडरची सोय करण्यास सांगितलं,” अशी माहिती व्हायरल व्हिडीओमध्ये पारस रुग्णालयाचा मालक असणाऱ्या अरिंजय जैन यांनी दिल्याचे दिसत आहे. दरम्यान,आम्हाला या प्रकरणामध्ये कोणतीही अधिकृत तक्रार मिळालेली नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.




