आकर्षक फुलांनी सजविलेला रथ…त्यात लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले संत श्री ज्ञानेश्वर महाराज…पालखीपुढे मानाच्या 27 दिंड्या, अश्व, नगरखाना असा हातात पताका घेऊन टाळ-वीणा-मृदंगांच्या गजरात “माऊलीं’चा वैभवी पालखी सोहळा सुरू होतो आणि संपूर्ण वातावरणच माऊलीमय होऊन जाते. “याची देही याची डोळा’ अनुभवावा असा हा अनुपम्य सोहळा असतो… या सोहळ्यावर अंकली येथील शितोळे सरकारांची असलेली छत्रछाया, दिंड्यातील वारकऱ्यांची स्वयंशिस्त, विश्वस्त व सोहळा प्रमुखांचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे दिवसेंदिवस माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चालणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांच्याशी सोहळ्याच्या लौकिकाविषयी चर्चा केली असता, ” सन 1832 साली ह.भ.प. हैबतरावबाबांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. पालखी रथाच्या पुढे मानाच्या 27 दिंड्या, त्यापुढे अश्व आणि नगरखाना तर मागे 251 नोंदणीकृत आणि अन्य दिंड्यांचा समावेश असतो.’ पालखी प्रस्थानाच्या दिवशी सकाळी माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक, भजन, कीर्तन, जागर होतो. दुपारी 12 वाजता महानैवेद्य दाखविल्यावर मंदिर परिसर मोकळा केला जातो. मानाच्या दिंड्यांचे मालक (रथापुढील 27 आणि मागील 20), मानकरी यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. त्यानंतर शितोळे सरकारांचे अश्व आणि शितोळे सरकार मंदिरात येतात. अश्व आणि माऊलींची भेट, दर्शन होते. प्रदक्षिणा घालून अश्व बाहेर जातात. माऊलींच्या पादुका संजीवन समाधीपासून प्रस्थान होवून पालखीत विराजमान होतात. पालखींची मंदिर प्रदक्षिणा होऊन सोहळ्याला सुरुवात होते आणि आजोळघरात पालखी विसावते. दररोज सकाळी सहा ते सात वाजता अंतरानुसार पालखी सोहळा प्रस्थान होतो. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी शितोळे सरकारांचा नैवेद्य असतो. तर दुपारचा नैवेद्य संस्थानचा असतो. या सोहळ्यात उभे तीन, तर गोल चार, असे एकूण सात रिंगण सोहळे असतात. सोहळ्यातील नीरा स्नान सोहळा पाहण्यासारखा असतो. पंढरपुरात पालखी सोहळा पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी एकादशीला नगर प्रदक्षिणा आणि इंद्रायणी स्नान होते. द्वादशीला मंदिरातच सोहळा असतो. त्रयोदशीला पांडुरंगाच्या भेटीला माऊली जातात आणि गोपाळकाला करून पौर्णिमेला सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. पंढरपूरकडे जाताना अठरा दिवसांचा, तर परतीचा नऊ किंवा अकरा दिवसांचा सोहळा आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पालखी सोहळ्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विश्वस्तांची निवड होते. त्यामध्ये एक प्रमुख विश्वस्त आणि एक पालखी सोहळा प्रमुख असतो. शितोळे सरकारांची छत्रछाया, वासकर महाराज, आरफळकर महाराज, चोपदार, विणेकरी, टाळकरी यांच्यासह मानकऱ्यांच्या नियोजनात शिस्तबद्ध रुपाने हा सोहळा पार पडतो. हा सोहळा सांगून अनुभवण्यापेक्षा चालून अनुभवल्यावर निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हा सोहळा प्रत्येकाने अनुभवावा. – ऍड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी