Lok Sabha Election 2024 : ‘पराभवाच्या भीतीने एक्झिट पोल मानवेना’; अमित शहांची काँग्रेसवर टीका

Exit polls | Amit Shah | Congress – एक्झिट पोलवर बहिष्कार टाकण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालत आहे ही नवीन गोष्ट नाही. काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालापूर्वीच आपला पराभव स्वीकारला आहे.
शहा म्हणाले, काँग्रेसने संपूर्ण निवडणुकीत विरोधी आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा प्रचार केला, पण आता निवडणुकीनंतर येणाऱ्या एक्झिट पोलमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागणार आहे, याचीही त्यांना कल्पना आहे. प्रसारमाध्यमांचा सामना कसा करणार या भीतीपोटी काँग्रेस एक्झिट पोल नाकारत आहे.
अमित शहा पूढे म्हणाले की, राहुल गांधी जेव्हापासून काँग्रेसच्या मुख्य रचनेत आले आहेत, तेव्हापासून काँग्रेस पक्ष सातत्याने ‘नकारात्मक स्थितीत’ जगत आहे. मी काँग्रेस नेत्यांना सांगू इच्छितो की, त्यांची शहामृग प्रवृत्ती कधीही कोणाचा फायदा करत नाही. पराभवाला धैर्याने सामोरे जावे आणि आत्मपरीक्षण करून पुढे जावे.
तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी जाहीर केले होते की त्यांचा पक्ष टीव्हीवरील एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही. काँग्रेसला निकालापूर्वी सट्टा लावायचा नाही. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचा निकाल मशिनमध्ये बंद झाला आहे.
4 जूनला निकाल सर्वांसमोर येईल. काँग्रेसच्या दृष्टीने निकाल जाहीर होण्याआधी कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक अंदाजात गुंतून टीआरपीचा खेळ खेळण्याचे कोणतेही समर्थन करत नाही.
अमित शहांच्या मते काॅंग्रेसची धोरणे…
१. सर्वोच्च न्यायालयाकडून अनुकूल निर्णय न आल्यास न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणे
२. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे
३. स्वत:चा पराभव दिसत असेल तर ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित कराणे
४. संसदेत चर्चा करण्याऐवजी संसदेतून सभात्याग करणे
५. देशाच्या घटनात्मक पदांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणे
६. घटनात्मक पदांची अवहेलना करणे
७. तपास यंत्रणांवर एजन्सींवरही प्रश्न उपस्थित करणे.





