बरेच जण व्यायाम हा फक्त बारीक होण्यासाठी करत असतात, पण खरं तर व्यायाम हा आपल्या दिवसातला एक अविभाज्य भाग असला पाहिजे. जसे आपण आठवणीने खातो, रोज आंघोळ करतो, तसा आठवणीने न कंटाळा करता व्यायाम करायला हवा. एकदा व्यायाम करण्याची सवय लागली की मग तो केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी, स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. आपल्या स्नायूंमधील चरबीचे प्रमाण आणि हाडांमधील चरबीचे प्रमाण योग्य असेल तर व्यायाम व योग्य आहाराने वजन कमी होण्यास मदत होते. व्यायाम करतानादेखील आहार कधी व कोणता घ्यावा हे देखील पाहावे लागेल. रिकाम्या पोटी व्यायाम करू नये. नाहीतर व्यायाम करून जे फायदे मिळायला हवेत ते मिळत नाहीत. जर स्नायूंना ताकद मिळेल अशी कार्बोदके आधी खाल्ली नसतील तर व्यायाम करताना स्नायूंना इजा पोहोचण्याची शक्यता जास्त असते. जर जिममध्ये आपण व्यायाम करत असू तर मध्ये मध्ये पाणी, इलेक्ट्रॉलचे पाणी घेत राहावे. व्यायामानंतरही स्नायूंना प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे जास्त व्यायाम केला आणि वजन कमी करायचे म्हणून कमी खाल्ले तर स्नायूंना इजा होऊ शकते. म्हणून व्यायामानंतर एक तासच्या अंतरात योग्य प्रथिने मिळतील असा आहार घेणे आवश्यक असते. 2 ते 3 तास उलटून गेल्यावर मग खाणे झाले पण तेही प्रथिने देणारा आहार घेतला नाही तर स्नायूंना बळकटी मिळण्याऐवजी त्यांना इजा पोचू शकते. व्यायाम सुरू करताना एकदम सुरू न करता हळूहळू सुरू करावा. व्यायामाच्यादृष्टीने दिवसभराच्या आहाराचे नियोजन करावे. जेणेकरून पोट्यॅशियम, सोडियम, प्रथिने व योग्य प्रमाणात कार्बोदके असे शरीराला आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात मिळतील. जिममधील व्यायाम हा योग्य मार्गदर्शनाखाली करावा. व्यायाम आणि आहार हे हातात हात घालून आपल्या शरीराला एकत्रितपणे बळकट करत असतात. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.