जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा उत्साहपूर्ण सोहळा

जेजुरी: हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भव्य उत्सव साजरा झाला. या सोहळ्यात जेजुरी परिसरातील ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, नित्यसेवेकरी आणि कर्मचारी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस अभिवादन केले.
महाद्वार पायरी मार्गावरील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ माजी राज्यमंत्री व पुरंदर-हवेली मतदारसंघाचे आमदार विजय बापू शिवतारे, माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे आणि पोपट खोमणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, बेल भंडारा आणि पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार शिवतारे म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर केवळ राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या एक विचार, चळवळ आणि स्त्री सक्षमीकरणाचे प्रतीक होत्या.”
या सोहळ्यात त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून विश्वस्त मंडळाने ३०० विद्यार्थिनींचे कन्या पूजन केले आणि त्यांना शालेय साहित्य वितरित केले. समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, नित्य वारकरी, सेवेकरी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवसंस्थानतर्फे सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा सोहळा अहिल्यादेवींच्या कार्याला आणि स्त्री सक्षमीकरणाला प्रेरणा देणारा ठरला.





