पुणे | पाण्याच्या टॅंकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहरातील फुरसुंगी भागात पाॅवर हाऊसजवळ टँकरने पाणी पाेहचविणाऱ्या एका टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. टँकरचे पाणी सोडताना अडथळा आल्याने पाइप तपासला असता, त्यातून साडी बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
काैशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा.हांडेवाडी,पुणे) असे मृत माहिलेचे नाव आहे. ती बेपत्ता असल्याची तक्रार काेंढवा पाेलीस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात टँकर चालक पुरुषाेत्तम नरेंद्र ससाणे (रा.हांडेवाडी,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत काैशल्या चव्हाण व तक्रारदार पुरुषाेत्तम ससाणे हे हांडेवाडी परिसरात दुगड चाळ याठिकाणी राहण्यास आहेत.
बुधवारी दिवसभर शहराच्या विविध भागात ससाणे यांनी टँकरने पाणीपुरवठा केला हाेता. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले व घराजवळ त्यांनी टँकर उभा केला.
गुरुवारी सकाळी त्यांनी टँकर बाहेर काढून रामटेकडी येथे टँकरमध्ये पाणी देखील भरले. टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पाॅवर हाऊस जवळ असलेल्या एका घरी पाणी पाेचविण्यास गेले, त्यांनी पाणी टँकरमधून सुरू केले परंतु टँकरमधून पाणी येत नव्हते, त्यामुळे त्यांनी पाण्याचा व्हाॅलव्ह तपासून पाइप बाहेर काढून पाहिला असता त्यांना टँकर मधून साडी बाहेर अाल्याचे दिसून अाले.
त्यामुळे त्यांनी साडी नेमकी काेठुन टँकर मध्ये आली हे पाहण्यासाठी टँकरचे झाकण उघडून आत डाेकावून पाहिले असता त्यांना टँकर मध्ये काैशल्या चव्हाण हिचा मृतदेह दिसला, त्यांनी याची माहिती तत्काळ हडपसर पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत, मृतदेह टँकरमधून बाहेर काढून पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, नेमका हा प्रकार कसा झाला याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या हे सांगता येणार नाही, असे हडपसर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक संताेष मांढरे यांनी सांगितले.
मुळचे उत्तरप्रदेशातील कुटुंब…
टँकरमध्ये मृतदेह आढळेल्या महिलेचा पती फरशी बसविण्याचे काम करतो, तर महिला साफसफाईचे काम करते. हे कुटुंब महिणाभरापूर्वीच उत्तर प्रदेशातून उंड्री येथे आले होते, त्यांना दोन लहान मुले आहेत. महिलेवर गावाकडे मानसिक उपचार सुरू होते. ती सकाळी नेहमीप्रमाणे घरी सांगून समोरच्या इमारतीत कामाला गेली होती.





