पुणे जिल्हा | …त्यालाच दगड खावे लागतात

इंदापूर, (प्रतिनिधी) – ज्या झाडाला चांगली फळ लागतात लोक त्याच झाडाला दगड मारतात.जिवणात चांगले काम करताना त्रास सहन करावाच लागतो.
त्यामुळे आपण विद्यार्थी दशेत असतानाच कोणाचाही विचार न करता आपल्या आई-वडीलांसाठी आपले काम चांगले पुढे करत राहिले पाहिजे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
कळंब (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रिडा समिती यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मुले व मुली तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.20) आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना उपाध्यक्ष कविता भैरट,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रीडा विभाग सहसचिव ऋषिकेश कुंभार, महाविद्यालयाचे माजी कार्यालयीन अधीक्षक शिवाजीराव कदम, डॉ.गौतम जाधव, डॉ. सुहास भैरट, ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांसह मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग म्हणाले की, आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्याला सोन्याचे दिवस आणले.
या महाविद्यालयावरती नेहमी सहकार्य व मार्गदर्शन असते. त्यांच्याच माध्यमातून महाविद्यालयाचा सर्वागीण विकास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील 15 महाविद्यालय व 39 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत शिंदे यांनी केले.





