Kapil Patil : माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्याने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेशाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.कपिल पाटील हे विधानपरिषदेचे आमदार होते. काहीच महिन्यांपूर्वी कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्ष हा स्वतंत्र पक्ष काढला होता. हा पक्ष देखील कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात विलीन केला आहे.
काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?
आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी माझा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. आपल्याला फॅसिझम विरुद्ध लढायचे आहे. राहुल गांधी गेली अनेक वर्षे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत. आम्हीही या लढाईत त्यांना साथ देण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आलो आहोत असे कपिल पाटील पक्षप्रवेशानंतर म्हणाले.





