Pimpri Chinchwad News – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम केंद्रांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी शहरात एकामागोमाग एक अशी तब्बल सतरा नऊ एटीएम गॅस कटर किंवा स्फोट घडवून फोडण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षक नसलेली एटीएम केंद्रे चोरट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले होते. मात्र आजही बहुतांश एटीएमला सुरक्षा रक्षकच नाहीत. शहरात विविध बँकांची एकूण ५७१ एटीएम केंद्रे कार्यरत आहेत. चिखली (३२), चिंचवड (२५), भोसरी (४०), सांगवी (३२), हिंजवडी-बावधन (८८), दिघी (२४) आदी भागांत मोठ्या प्रमाणात एटीएम आहेत. पिंपरी-संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत ५८, निगडी ३५ आणि एमआयडीसी भोसरी येथे ३७ एटीएम केंद्रे आहेत. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने चोरट्यांनी रात्रीच्या वेळी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापून रोकड लंपास केली. या आहेत एटीएम फोडीच्या घटना २४ जुलै २०१८ रोजी टेल्को रस्त्यावरील स्टेट बँकेचे एटीएम कापताना दहा लाखांची रक्कम जळाली. १ डिसेंबर २०१८ रोजी संत तुकारामनगर येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून दीड लाख रुपयांची चोरी झाली. ८ डिसेंबर २०१८ रोजी रहाटणीतील एसबीआय एटीएममधून २१ लाख, तर आकुडीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ३२ लाखांची रोकड चोरट्यांनी पळवली. २० फेब्रुवारी २०१९ रोजी पिंपळे गुरव येथील एटीएममधून सहा लाख ७५ हजार ७०० रुपये चोरीस गेले. १६ मार्च २०१९ रोजी भोसरी धावडे वस्तीतील दोन एटीएम फोडून ३५ लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला. नोव्हेंबर २०१९ मध्ये प्राधिकरण व नेवाळेवस्ती, चिखली येथील एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. रात्रीच्या घटना सकाळी येतात उघडकीस बहुतेक घटनांमध्ये एटीएममधील व्यवहार ऑनलाइन दिसेनासा झाल्यानंतर सकाळी बँक अधिकारी तपासणीसाठी पोहोचतात आणि त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस येतो. तोपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. काही ठिकाणी हलक्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याने त्याचा तपासात विशेष उपयोग झालेला नाही. एटीएमचा असतो विमा डिजिटल व्यवहार वाढल्याने एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी शहरातील एटीएमची संख्या मोठी आहे. खर्चात कपात करण्याच्या धोरणामुळे अनेक बँकांनी सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. एटीएमचा विमा असल्याने सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. सध्या एटीएम फोडण्याच्या घटना थांबल्या असल्या तरी सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एटीएम केंद्रांमध्ये सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांची गस्त एटीएम फोडीच्या घटना लक्षात घेऊन रात्रीच्यावेळी गस्त घालताना बीट मार्शलला सर्व एमटीएमला भेट देणे अनिवार्य केले आहे. प्रत्येक एटीएमजवळ स्कॅनर ठेवण्यात आला असून बीट मार्शल तो स्कॅनर स्कॅन केल्यावर याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडे जाते. पोलिसांच्या गस्तीमुळे एटीएम फोडीच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत. परंतु दिवसा एटीएममध्ये अल्पशिक्षित आणि ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत असते. बॅंकांनी पोलिसांवर पूर्णपणे अवलंबून न राहता सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी होत आहे.