EVM Security: मतमोजणी २१ तारखेला! मंचर पोलिसांना आता ‘स्ट्रॉंग रूम’ची धाकधूक; ईव्हीएम सुरक्षा चिंतेचा विषय

प्रभात वृत्तसेवा
मंचर – नगरपंचायतीची मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आता पोलिसांवर येऊन पडली आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममधील सर्व मतदान मशीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरात दिवस-रात्र जागता पहारा ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत दक्ष होती.निवडणूक सुरळीत पार पडल्यानंतर काही प्रमाणात निवांत होऊ, अशी पोलिसांची अपेक्षा होती. परंतु मतमोजणी ३ तारखेला न होता न्यायालयाच्या आदेशानुसार ती आता रविवार, दि.२१ रोजी होणार असल्याने पोलिसांचे काम आणखी वाढले आहे.
दरम्यान, स्ट्रॉंग रूम परिसरात सीसीटीव्ही देखरेख, ये-जा नोंद, प्रवेशबंदी, अतिरिक्त गस्त अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणतीही अफवा किंवा अनधिकृत हालचाल होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने तपासणी सुरू आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशीनची सुरक्षा ही पोलीस यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी बनली असून पोलीस कर्मचारी पूर्ण सतर्कतेने ड्युटी बजावत आहेत.





