ठाण्यासह अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद; नागरिकांचा खोळंबा

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 8 राज्यांतील 49 जागांवर सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे.
नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच 13 लोकसभेच्या मतदानाने सांगता होईल.
ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार समोर
पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र असे असताना नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह काही भागात ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार समोर येत आहे.
नाशिकमध्ये मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन बंद पडले. आडगाव परिसरातील दोन ईव्हीएम मशीन बंद झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील नौपाडा येथील ईव्हीएम मशीन बंद पडले असल्याने मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या ईव्हीएम दुरुस्तीचे काम सुरु आहे.
धुळे शहरातील एल एम सरदार शाळेतील मतदान केंद्रावर जवळपास अर्धा तास ईव्हीएम मशीन बिघाड झाल्याने बंद आहेत. तसेच कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळा येथील मतदान केंद्रात एक मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा:
मायावतींनी लखनौमध्ये केले मतदान ; मतदानानंतर म्हणाल्या,”प्रत्येकाने मतदानासाठी घराबाहेर पडावे”





