EVM | Rahul Gandhi – भारतात ईव्हीएम मशिन म्हणजे एक ब्लॅक बॉक्स असून त्याची छाननी किंवा शहानिशा कोणालाच करता येत नाही असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल “गंभीर चिंता” व्यक्त केली जात आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा निर्णय प्रक्रियेतील संस्थांमध्ये कोणतेही उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही ही लबाडी बनते आणि त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते. राहुल गांधी यांनी आज प्रसिद्ध झालेली एक बातमीही आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये जोडली असून या बातमीत दावा करण्यात आला आहे की, मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदार संघातून केवळ ४८ मतांनी निवडणूक जिंकलेले शिवसेना उमेदवार रविंद्र वायकर यांच्या एका नातेवाईकाने त्याच्या फोनद्वारे ईव्हीएम मशिन अनलॉक केले होते. राहुल गांधी यांनी इलॉन मस्कच्या एक्सवरील पोस्टकडेही लोकांचे लक्ष वेधले आहे, ज्यात मस्क यांनी ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याची प्रथा बंद केली पाहिजे असे म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मानवी हस्तक्षेपाद्वारे किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्राद्वारे हॅक होण्याचा धोकामोठा असतो असे मस्क यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. विरोधी पक्ष गेल्या काही काळापासून ईव्हीएमवर चिंता व्यक्त करत आहेत आणि त्यांनी व्हीव्हीपीएटी स्लिपची १०० टक्के मोजणी करण्याची मागणीही केली होती, ज्याला कोर्टाकडूनही अनुमती मिळू शकलेली नाही.