Donald Trump : सबकुछ ट्रम्प.! अमेरिकन डॉलरवर आता ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार
अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरच्या नोटेवर आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. डॉलर हे चलन अमेरिकेत १८६१ पासून अस्तित्वात आले.

Donald Trump : अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरच्या नोटेवर आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे. डॉलर हे चलन अमेरिकेत १८६१ पासून अस्तित्वात आले.
तेंव्हापासून अमेरिकेच्या एखाद्या विद्यमान अध्यक्षाची स्वाक्षरी प्रथमच चलनी नोटेवर छापली जाण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला यंदा २५० वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वर्षापासून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांची स्वाक्षरी डॉलरच्या नोटेवर दिसणार आहे, असे अमेरिकेचे कोषाध्यक्ष ब्रँडन बीच यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी राष्ट्रीय कला आयोगाने ट्रम्प यांचे चित्र असलेल्या २४-कॅरेट सोन्याचे नाणे देखील तयार केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या नाण्याच्या अंतिम डिझाइनला मंजुरी दिली गेली.
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक प्रगती करत आहे. डॉलरचे स्थायी वर्चस्व आणि वित्तीय सामर्थ्य आणि स्थैर्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपण अभूतपूर्व प्रगती करत आहोत. ही ऐतिहासिक कामगिरी दर्शवण्यासाठी यापेक्षा अधिक उत्तम मार्ग काही असू शकत नाही, असे स्कॉट बेसेंट म्हणाले.






