Nana Patekar : बाईंच्या जाण्याने सगळे काही संपले! विजया मेहतांच्या निधनानंतर नाना पाटेकरांचे डोळे पाणवणारे शब्द
Nana Patekar : विजया मेहता यांना नाना आईच्या स्थानावर मानत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून अनेकांचे डोळे पाणवणाऱ्या आहेत.

Nana Patekar : मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि निर्मात्या विजया मेहता यांच्या निधनाने संपूर्ण नाट्यविश्व शोकसागरात बुडाले आहे. मात्र त्यांच्या जाण्याचा सर्वाधिक भावनिक धक्का ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बसला आहे. विजया मेहता यांना नाना आईच्या स्थानावर मानत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना ऐकून अनेकांचे डोळे पाणवणाऱ्या आहेत.
नाना म्हणाले, “या आयुष्यात माझ्या तीन स्त्रियांना आईचं स्थान होतं. एक माझी जन्मदात्री आई, दुसऱ्या सुलभा देशपांडे आणि तिसऱ्या विजया मेहता. आज बाई गेल्या आणि पुन्हा एकदा पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. त्यांच्या जाण्याने सगळंच संपल्यासारखी भावना मनात आहे.” ( Nana Patekar )
तीच भेट अखेरची ठरली (Nana Patekar)
नानांनी एक आठवण सांगितली ते म्हणाले, विजया मेहतांच्या वाढदिवसानिमित्त काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भारती आचरेकर यांच्यासोबत भेट घेतली होती. दादरमधून विविध प्रकारची फुलं आणून त्यांनी स्वतः ती घरातील फ्लॉवरपॉटमध्ये सजवली होती. तीच भेट अखेरची ठरेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती.
मला कलाकार म्हणून घडवलं (Nana Patekar)
नाना म्हणाले, “त्यांच्या मुलीचा निधनाचा फोन आला तेव्हा माझी अवस्था शब्दांत सांगता येणार नाही. आईने मला जन्म दिला, पण अभिनयाच्या क्षेत्रात मला घडवण्याचं काम विजयाबाईंनी केलं. मातीच्या गोळ्याला आकार द्यावा तसं त्यांनी मला कलाकार म्हणून घडवलं. रंगमंचावर कसं उभं राहायचं, भूमिकेचा गाभा कसा समजून घ्यायचा आणि प्रेक्षकांच्या मनापर्यंत कसं पोहोचायचं, हे सगळं त्यांनी शिकवलं. माझ्याकडे अभिनयाचं जे काही आहे, ते त्यांच्या शिकवणीमुळेच आहे.”

Nana Patekar : बाईंच्या जाण्याने सगळे काही संपले! विजया मेहतांच्या निधनानंतर नाना पाटेकरांचे डोळे पाणवणारे शब्द
मराठी रंगभूमीवर विजया मेहता यांना आदराने ‘बाई’ म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले. रंगभूमीवरील शिस्त, प्रयोगशील दिग्दर्शन आणि अभिनयाची वेगळी शैली यासाठी त्यांची खास ओळख होती.
विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व गमावले असून, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी घडवलेले कलाकार हेच त्यांच्या कार्याचा खरा वारसा ठरणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घडवलेला प्रत्येक कलाकार त्यांच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त करत आहे.
हेही वाचा : Doctor Celebs: पांढरा कोट ते रुपेरी पडदा! डॉक्टरकीची पदवी घेऊन अभिनय क्षेत्रात चमकले हे लोकप्रिय कलाकार





