निवडणुकीतील पराभवातूनही सर्वांनी धडा शिकायला हवा; पंतप्रधानांचा महासचिवांना सल्ला

नवी दिल्ली: देशात नुकत्याच ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात काही ठिकाणी भाजपाला यश मिळाले तर काही ठिकाणी अपयश पदरी पडले. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदाच एक बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये सर्व महासचिव उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुमारे ५ तास ही बैठक झाली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, पराभव असो वा विजय भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्याचा सविस्तर आढावा घ्यायला हवा. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याप्रमाणे तयारी करणे शक्य होईल.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. मात्र, तरीही तृणमूल काँग्रेसने चांगले पुनरागमन केले आणि विजय मिळवला. मात्र, तरी पराभवातूनही शिकायला हवे, असे मोदी म्हणाले.
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचा सल्लाही पंतप्रधान मोदींनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजप नेत्यांनी स्थानिक भाषांचा उत्तमपणे वापर आणि विस्तार करावा, असेही मोदींनी सांगितले. सर्व महासचिवांसोबत झालेल्या बैठकीत भाजपकडून सुरू करण्यात आलेल्या सेवा ही संघटन या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना बुथ लेवल बैठकीत कार्यकर्त्यांनी घेरले आणि निषेध नोंदवला. तसेच कर्नाटकमध्येही मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे.





