अडीच महिन्यांनंतरही भरपाई मिळेना

भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील सणसर रायतेमळा या ठिकाणी नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले; परंतु अडीच महिने होऊन गेले तरीही अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे या भागातील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार याची अद्यापही कल्पना नाही. आतापर्यंत ही नुकसान भरपाई मिळाला नाही, मग कधी मिळणार? अशी मागणी करीत आहेत.
इंदापूर तालुक्यातील सणसर रायतेमळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने या कालव्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणावरील पाहणी करून पंचनामे केले.
या घटनेला अडीच महिने होऊन गेले; परंतु अजूनही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे, त्या शेतकऱ्यांनी आहे त्या शेतामध्ये नांगरणी करून पुन्हा पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु शेतातील माती वाहून गेल्याने या शेतामध्ये चांगल्या प्रतीचे पीक येणे कठीण झाले आहे, अशी येथील शेतकऱ्यांनी माहिती दिली.
या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे केले; परंतु अडीच महिने झाले तरी अजूनही जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल. नुकसान भरपाई मिळणार आहे की नाही याबाबत येथील शेतकरी चर्चा करीत आहेत. आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कधी नुकसान भरपाई मिळेल याचे मात्र अजूनही निश्चित नाही. यामुळे या भागातील शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत असून नक्की संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांबाबत दयामाया येते की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
“महसूल’कडून अपेक्षा
आपत्कालीन निधी हा महसूल विभागाअंतर्गत निधी दिला जातो. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले; परंतु याला अडीच महिने होऊन गेले अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
महसूल विभागाअंतर्गत आपत्कालीन निधीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांचे शेतात जाऊन पंचनामे केले आहेत व त्या शेतकऱ्यांना महसूल विभागामार्फत नुकसान भरपाई दिले जाते.
-शामराव भोसले, शाखा अभियंतापाटबंधारे विभाग सणसर
पाच घरांसह 43 एकरमधील नुकसान
पाटबंधारे विभाग सणसरचे शाखा अभियंता शामराव भोसले, तलाठी गोरख बारवकर, सणसर विभागाचे कृषी सहाय्यक मार्तंड देवडे, कोतवाल मुकुंद चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. यामध्ये साधारण 45 शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पाच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सणसर रायतेमळा या ठिकाणी निरा डाव्या कालव्याला तीन वेळा भगदाड पडल्याने 11 हेक्टर 31 आर म्हणजे (तीस एकर) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. आणि 5 हेक्टर 31 आर म्हणजे (तेरा एकर) शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाऊन या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.





